लोकसेवा हक्काची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी : चित्रा कुलकर्णी
Right to public service should be implemented effectively: Chitra Kulkarni
कायद्याच्या जनजागृतीसाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Fir 17 Jan 25 17.20 pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमान्वये नागरिकांना पारदर्शक व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असून, या कायद्याची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले.
सदर बैठकीमध्ये शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ नागरिकांना सुलभरित्या व तत्परतेने घेता यावा, यासाठी विभागांतर्गत येणाऱ्या अधिकतम सेवा अधिसूचित करण्यासोबतच कायद्याच्या जनजागृतीसाठी विभागप्रमुखांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शुक्रवारी कोपरगाव पंचायत समिती सभागृहात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या संदर्भात अंमलबजावणीच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व तालुकास्तरीय विभाग प्रमुखांना दिले.

आयुक्त यांनी कोपरगाव नगरपरिषदेत विविध सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सेवानिहाय आढावा घेतला. तसेच नगरपरिषदेतील आपले सरकार कक्ष तसेच विविध विभागांना भेटी दिल्या.
कायद्यांतर्गत आयोगाचे अधिकार, शासकीय लोकसेवकाची कर्तव्य व दायित्व, सामान्य जनतेला लाभदायी ठरण्यासाठी अधिसूचीत सेवांत सुधारणा, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नैतिक जबाबदाऱ्या, कायद्याचे काटेकोर पालन याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रंसगी अधिकाऱ्यांव्दारे विचारण्यात आलेल्या प्रश्न व शंकांचे निरसन आयुक्त श्रीमती कुलकर्णी यांनी केले.
यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप, नायब तहसीलदार श्रीमती प्रफुल्लीता सातपुते, सहायक गट विकास अधिकारी संदीप दळवी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पोलिस निरीक्षक संदीप कोळी, गट शिक्षणाधिकारी शबाना शेख, सामाजिक वनीकरणचे निलेश रोडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रतिभा खेमनर तसेच जलसंधारण, महावितरण, पशुसंवर्धन, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभागव पंचायत समितीचे विभागप्रमुख उपस्थित होते.





