पालिकेने श्रावण स्नानांसाठी महिलांची स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था करावी- संजीवनी युवा प्रतिष्ठान
Municipal Corporation should make separate and safe arrangements for women to take Shravan bath – Sanjeevani Yuva Pratishthan
प्रत्येक श्रावणी सोमवारी संध्याकाळी गंगा गोदावरीआरती
कोपरगाव : श्रावण मासानिमित्त महिला मोठ्या संख्येने स्नानासाठी येतात गोदावरी नदीच्या काठी महिलांसाठी स्नानाची सोय उपलब्ध करून देण्याची गरज आहे, तिथे त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपालिकेने ती व्यवस्था करावी या मागणीचे निवेदन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेला बुधवारी(२३) रोजी देण्यात आले.
या निवेदनात श्रावण मासात अनेक महिला येथील गोदावरी नदीत स्नान करणे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानतात. गोदावरी नदीच्या काठी स्नानाला येणाऱ्या महिलांसाठी सुरक्षिततेची भावना असणे आवश्यक आहे. त्यांना कपडे बदलण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिल्यास, त्यांची सुरक्षितता सुनिश्चित होईल. महिलांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ जागा उपलब्ध करून दिल्यास, त्यांना स्वच्छतेच्या दृष्टीनेही सोयीचे होईल. घाटावरील सुरक्षा कठडे तातडीने दुरुस्त करणे,कपडे बदलण्यासाठी छत असलेली जागा, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अशा सोयी उपलब्ध करून दिल्यास, महिलांना नदीत स्नान करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहील. असे म्हटले आहे
प्रत्येक श्रावणी सोमवारी होणाऱ्या गंगा-गोदावरी महाआरतीस हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. परंतु, गोदा घाटावरील लोखंडी सुरक्षा कठडे मोडकळीस आलेले असून त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. हे कठडे तातडीने दुरुस्त करून नागरिकांचे जीवित सुरक्षित करण्याची मागणी प्रतिष्ठानने केली आहे. येत्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही यंत्रणा, आपत्कालीन सेवा यांचा समावेश असलेली भक्कम दीर्घकालीन व्यवस्था पालिकेने करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रतिष्ठानकडून तात्पुरत्या स्वरूपात एक महिन्यासाठी असे कक्ष उभारण्यास नगरपालिकेची परवानगी मागण्यात आली आहे.
संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आलेले आहे नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या वतीने हे निवेदन कार्यालयीन अधिक्षक कविता सोनवणे यांनी स्वीकारले. यावेळी युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





