कोपरगावात किरकोळ कुरबुरी वगळता शांततेत मतदान; अंदाजे ६८ टक्के मतदान

कोपरगावात किरकोळ कुरबुरी वगळता शांततेत मतदान; अंदाजे ६८.१६ टक्के मतदान

Voting in Kopargaon was peaceful except for minor disturbances; approximately 68 percent voter turnout.

सकाळी मतदारांचा निरुत्साह, दुपारनंतर रांगा; आज मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

एकूण झालेले मतदान – पुरुष २१,९७२ + महिला २१,२७४ + इतर १ एकूण मतदान ४३२४७(६८.१६%) 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSat20 Dec 20.00Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २०) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. किरकोळ वाद, तांत्रिक अडचणी व बाचाबाचीच्या घोषणाबाजी घटना वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.  दिवसभरात टप्प्याटप्प्याने मतदानात वाढ होत गेली असून, अंतिम टप्प्यात मोठ्या प्रमाणावर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याने अंदाजे ६८.१६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण ६३,४४८ मतदार असून, यामध्ये ३१,१३२ पुरुष, ३२,३१२ महिला व इतर ४ मतदारांचा समावेश आहे.

सकाळी मतदानाचा वेग मंद

सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदारांचा उत्साह काहीसा कमी दिसून आला. सकाळी पहिल्या टप्प्यात २,९४३ पुरुष व १,७६७ महिलांनी मतदान केल्याने एकूण ४,७१० (७.४२%)  मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात सकाळी ११.३० वाजेपर्यंत ५,८३३ पुरुष व ४,९८४ महिलांनी मतदान करत एकूण ११,८१७ (१८.४२%)  मतदान नोंदवले गेले.

दुपारनंतर मतदानात लक्षणीय वाढ

दुपारनंतर मात्र मतदानाचा वेग वाढला. दुपारी १.३० वाजेपर्यंत ११,०४१ पुरुष, ९,६३३ महिला व इतर १ मतदार अशा एकूण २०,६७५  (३२.५९%) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ३.३० वाजेपर्यंत १५,४५९ पुरुष, १५,३३९ महिला व इतर १ अशा एकूण ३०,७९९ (४८.५४%) मतदानाची नोंद झाली. सायंकाळच्या टप्प्यात अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या.

किरकोळ वाद, मशीन बंद पडल्याने तणाव

मतदानादरम्यान काही प्रभागांमध्ये उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींमध्ये किरकोळ कुरबुरी व शाब्दिक बाचाबाची झाल्या. प्रभाग क्रमांक  १२/२ (नगरपालिका शाळा) येथील मतदान केंद्रावर काही काळ मशीन बंद पडल्याने  तणावाचे वातावरण निर्माण झाले. उमेदवार प्रतिनिधी कैलास मंजुळे यांनी यावर हरकती घेतल्या. मात्र वाया गेलेला वेळ वाढवून देण्यात येईल,असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त सज्ज असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.

नवमतदार, ज्येष्ठ व दिव्यांगांचा सहभाग

नवमतदारांसह ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनीही उत्साहाने मतदान केले. आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोक काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह नगराध्यक्षपदाचे उमेदवार विविध पक्षांचे नेते मतदान केंद्रांवर भेटी देत परिस्थितीचा आढावा घेत होते.

पाच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचे भवितव्य बंद

कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत काका कोयटे, सपना मोरे, राजेंद्र झावरे, विजय वहाडणे व पराग संधान या पाच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह १२२ नगरसेवक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. चार वर्षे रखडलेल्या निवडणुकीमुळे आणि तब्बल १८ दिवस चाललेल्या प्रचारामुळे ही निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची ठरली आहे.

आज, रविवार (दि. २१) रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे कोपरगावकरांचे लक्ष लागले असून, जनतेने कोणाला कौल दिला याचा फैसला काही तासांत स्पष्ट होणार आहे.

चौकट 

सरासरी मतदानाची आकडे आकडेवारी येण्यास उशीर असल्याने अंदाजीत मतदाना आकडेवारी गृहीत धरण्यात आली आहे. ही आकडेवारी अधिकृत नाही केवळ अंदाज आहे. यात अधिकृत आकडेवारी कमी जास्त होऊ शकते.

कोपरगाव नगरपालिकेसाठी एकूण मतदान  ६८४४८ इतकं आहे. यामध्ये ३१,१३२  पुरुष,  ३२,३१२ महिला व इतर ४ मतदारांचा समावेश आहे.

एकूण झालेले मतदान (६८.१६%)  : एकूण ४३,२४७ मतदान (पुरुष २१,९७२ + महिला २१,२७४ + इतर १ एकूण मतदान ४३२४७(६८.१६%)

Leave a Reply

You cannot copy content of this page