माजी मंत्री शंकरराव कोल्हे जयंती; ‘प्रेरणा दिन’ दणक्यात; कोपरगावात विकास-सेवेचा दमदार संदेश

माजी मंत्री शंकरराव कोल्हे जयंती; ‘प्रेरणा दिन’ दणक्यात; कोपरगावात विकास-सेवेचा दमदार संदेश

Former Minister Shankarrao Kolhe’s Birth Anniversary: ​​‘Inspiration Day’ Celebrated with Great Fervor; A Powerful Message of Development and Service Resonates in Kopargaon.

रस्ते, आरोग्य, शिक्षण ते रुग्णवाहिका—उपक्रमांची सरबत्ती; कोल्हे विचारांना कृतीतून सलाम

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 24Tue.19.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :माजी मंत्री व सहकार महर्षी स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त ‘प्रेरणा दिन’ कोपरगाव शहर व तालुक्यात दणक्यात साजरा झाला. केवळ अभिवादनापुरते मर्यादित न राहता, विकास, आरोग्य आणि समाजकारणाची ठोस अंमलबजावणी करत कोल्हे साहेबांच्या कार्याला खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यात आले.

मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने कोल्हे साहेबांच्या भव्य तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरातील संत जनार्दन स्वामी महाराज सेतू ते मोहिनीराज नगर (प्रभाग १५) या रस्त्याच्या डांबरीकरणाचे लोकार्पण नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते झाले. “चार वर्षांपासून रखडलेली कामे मार्गी लावताना रामनवमीच्या पालखी मार्गावरील हजारो भाविकांच्या सोयीला प्राधान्य दिले,” असा ठाम दावा संधान यांनी यावेळी केला.

शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सोयीवरही भर देत संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूलला वॉटर फिल्टर कुलर युनिट देण्यात आले. दुसरीकडे, औद्योगिक वसाहतीत संजीवनी युवा प्रतिष्ठान, आरोग्य साथी फाउंडेशन व आत्मा मलिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत टी.बी. तपासणी व सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या हस्ते झाले. “ग्रामीण उद्योजकांनी देश-विदेशात झेप घ्यावी, हे कोल्हे साहेबांचे स्वप्न होते; ते आता प्रत्यक्षात उतरताना दिसते,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
समाजभान जपत विविध उपक्रमही राबवण्यात आले. प्रभाग ६ मधील नगरसेवक पद्मावती बागुल व विक्रमादित्य सातभाई यांच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले, तर शिंगणापूरचे माजी सरपंच भीमराव संवत्सरकर यांनी ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपली.
संध्याकाळी IDBI बँकेच्या सहकार्याने कोपरगाव नगरपालिकेसाठी सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण बिपिन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पार पडले. या वेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
एकूणच, कोल्हे साहेबांच्या जयंतीनिमित्त साजरा झालेला ‘प्रेरणा दिन’ हा केवळ स्मरणाचा कार्यक्रम न ठरता, विकास आणि जनसेवेच्या ठोस कृतीतून त्यांच्या विचारांचा जागर करणारा ठरला.

Leave a Reply

You cannot copy content of this page