कोपरगाव : तालुक्यातील व्यापारी राजकारणात पुन्हा एकदा ‘काका’चा डंका वाजला आहे. कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या फेरनिवडीत अध्यक्षपदी ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काका कोयटे यांची निर्विवाद पुनर्निवड होत त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. महासंघाच्या सत्ताकेंद्रावर काकांची पकड अजूनही मजबूत असल्याचे या निवडीतून स्पष्ट झाले आहे.
कार्याध्यक्षपदी अजित लोहाडे व सुधीर डागा यांचीही फेरनिवड करत महासंघाने अनुभवी फळीवरच भर दिला आहे. बदलाच्या चर्चा रंगल्या असताना अखेर जुनेच नेतृत्व कायम ठेवत स्थैर्याचा मार्ग निवडण्यात आला. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या या टीमवर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे.
काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली महासंघाने केवळ बैठकींचा गाजावाजा न करता प्रत्यक्ष कामातून बाजारपेठेला चालना दिली. किराणा दुकानदारांपासून छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत विविध योजना, सवलती आणि मार्गदर्शन देत व्यापारवृद्धीचा पाया भक्कम करण्यात आला. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाला पर्याय नसल्याची भावना व्यापारी वर्तुळात दृढ झाली आहे.
दरम्यान, नव्या कार्यकारिणीत काही ताज्या चेहऱ्यांची एन्ट्री करून महासंघाने ‘नव्या दमाला’ही संधी दिली आहे.
उपाध्यक्षपदी उद्योजक संजय भन्साळी आणि एस.जे.एस. हॉस्पिटलचे प्रमुख चांगदेव कातकडे यांची निवड करण्यात आली आहे. तर युवा उद्योजक यश विसपुते यांना संचालकपदी संधी देत नव्या पिढीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या तिकडीमुळे महासंघाच्या कारभारात नवसंजीवनी येणार, अशी चर्चा रंगली आहे.
महासंघाने आता पुढचा ‘टप्पा’ गाठण्याचा निर्धार केला असून व्यापारी चळवळ अधिक व्यापक करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या २४ मे रोजी ‘गाव तेथे उद्योजक’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासोबतच भव्य उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या मेळाव्यामुळे तालुक्यातील उद्योजकतेला नवी दिशा मिळणार, असा दावा महासंघाकडून करण्यात आला आहे.
सदर कार्यकारिणीत अध्यक्ष ओमप्रकाश (काका) कोयटे, कार्याध्यक्ष अजित लोहाडे, सुधीर डागा, महासचिव प्रदीप साखरे, उपाध्यक्ष राजकुमार बंब, नारायण अग्रवाल, संजय भन्साळी, केशवराव भवर, आशुतोष पटवर्धन, चांगदेव कातकडे, खजिनदार तुलसीदास खुबाणी, सचिव गुलशन होडे, सहसचिव महावीर सोनी, किरण शिरोडे यांचा समावेश आहे.
तसेच संचालक मंडळात कृष्णाशेठ उदावंत, योगेश बागुल, बबलू वाणी, चेतन खुबाणी, सुमित भट्टड, शरद खरात, दीपक गुजराथी, हेमचंद्र भवर, संजय दुशींग, संदीप काबरा, युवराज गांगवे, आनंद लोढा, प्रमोद मुंदडा, अक्षय सोनेकर यांची निवड करण्यात आली आहे. चौकट : युवा आघाडीला नवा ‘जोश’
युवा आघाडीच्या समन्वयकपदी हर्षल कृष्णानी, मानव शुक्ला, धीरज कराचीवाला, यश विसपुते, अक्षय गिरमे, गोल्डी शिरोडे यांची निवड करण्यात आली. नव्या दमाची ही टीम महासंघाच्या कामकाजाला आक्रमक धार देणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.