“काम करा नाहीतर घरी बसा!” नगराध्यक्ष पराग संधान यांचा ठेकेदारांना थेट इशारा
“Work, or Stay Home!” Council President Parag Sandhan Issues Direct Warning to Contractors
कर्मवीरनगरात प्रलंबित रस्त्यांना गती; “नेतृत्व बदललं की विकास दिसतोच!” — संधान यांचा रोखठोक निर्धार
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 28Sat.16.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर परिसरातील वर्षानुवर्षे रखडलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या कामांना अखेर सुरुवात झाली असून, नगराध्यक्ष पराग संधान यांनी पदाधिकारी व नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करत ठेकेदार व प्रशासनाला खडसावले. “कामात हलगर्जीपणा चालणार नाही, इस्टिमेटप्रमाणे दर्जा हवा; अन्यथा काम बंद!” असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिला.
कर्मवीरनगर हा ‘त्रिशंकू’ भाग पूर्वी नगरपरिषद हद्दीत नव्हता. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा भाग शहरात समाविष्ट झाला. शासनाकडून निधीही मंजूर झाला, मात्र माजी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विकास कामे ठप्पच राहिली होती. आता नव्या नेतृत्वाखाली ही ‘थांबलेली गाडी’ वेगाने धावू लागल्याचे चित्र आहे.
युवानेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांनी “आता थांबायचं नाही, फक्त काम करायचं!” हा निर्धार करत सर्व प्रभागांमध्ये विकासकामांना वेग दिला आहे. २०२४ मध्ये वर्क ऑर्डर होऊनही रखडलेल्या कामांबाबत संधान यांनी ठेकेदारांना तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.
“रस्त्यांवरचा धूळकण कमी व्हायला लागला, पाण्याची गुणवत्ता सुधारते आहे, शहर स्वच्छतेला गती मिळते आहे. हा बदल कोपरगावकर अनुभवत आहेत. नेतृत्व बदललं की विकास कसा होतो, हे आता स्पष्ट दिसतंय,” असा टोला संधान यांनी लगावला.
कामांच्या गुणवत्तेबाबतही त्यांनी कठोर भूमिका घेतली. “डांबर मोजणीच्या पावत्या दाखवाव्याच लागतील, मंजूर निधी व देखभाल तपशील नागरिकांसाठी फलकावर मांडला गेला पाहिजे. आम्हाला श्रेयासाठी नव्हे, सेवेसाठी काम करायचं आहे. काही जण फक्त फोटोसेशन करत आहेत; पण जनता सगळं ओळखते,” असे संधान यांनी ठणकावून सांगितले.
या पाहणीवेळी गटनेते प्रसाद आढाव, आरोग्य सभापती वैभव आढाव, नगरसेवक स्वप्निल मंजुळ, फिरोज पठाण,उमेश धुमाळ, वैभव गिरमे, निसार शेख, नईम शेख यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
5





