संजीवनीचा एआयमध्ये जागतिक झेंडा; ‘एर्डोस’-ऑक्सफर्डसोबत करार
Sanjeevani Plants a Global Flag in AI; Signs Agreement with ‘Erdos’–Oxford
ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक संशोधनाची मोठी संधी
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 28Sat.16.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात ठोस पाऊल टाकत संजीवनी विद्यापीठाने थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाशी संबंधित ‘एर्डोस रिसर्च’ संस्थेसोबत करण्यात आलेल्या परस्पर सामंजस्य करारामुळे संजीवनीने जागतिक संशोधनाच्या नकाशावर ठळकपणे आपले स्थान निर्माण केले आहे.
या करारावर एर्डोस रिसर्च संस्थेचे संशोधक व ऑक्सफर्डचे प्राध्यापक प्रा. अजित जावकर आणि संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. विद्यापीठाच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याला प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
या कराराअंतर्गत संजीवनी विद्यापीठात ‘एआय असिस्टंट रिसर्च सेंटर’ उभारण्यात येणार असून संशोधनाला नवे बळ मिळणार आहे. केवळ शिक्षण नव्हे तर संशोधनाधारित विद्यापीठ घडवण्याच्या दिशेने हा निर्णायक टप्पा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावेळी बोलताना प्रा. अजित जावकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “एआयचा वापर जगभर झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन समस्यांवर संशोधनातून उपाय शोधणे हा ऑक्सफर्डचा उद्देश आहे. संजीवनीमध्येही असेच संशोधनात्मक वातावरण तयार व्हावे, यासाठी हा करार महत्वाचा ठरेल.”
संजीवनीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनीही ठामपणे सांगितले की, “संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांची संशोधनाधारित विद्यापीठाची संकल्पना आता प्रत्यक्षात उतरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट जागतिक दर्जाचे संशोधन करण्याची संधी मिळणार आहे, ही मोठी उपलब्धी आहे.”
अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी या कराराला “संजीवनीच्या इतिहासातील नवा अध्याय” असे संबोधत आजचा दिवस संस्मरणीय ठरणार असल्याचे सांगितले.
या करारामुळे संजीवनीतील पाच प्राध्यापक आणि अठरा विद्यार्थ्यांना थेट ऑक्सफर्डमधील एर्डोस रिसर्च संस्थेत तज्ञ मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. रिसर्च प्रोजेक्ट्स, कौशल्यविकास आणि आंतरराष्ट्रीय अनुभव या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी नवे दालन खुले होणार आहे.
भारतामध्ये सुमारे १२०० विद्यापीठे असताना ग्रामीण भागातील संजीवनीला मिळालेली ही संधी मोठी कामगिरी मानली जात आहे. एआय क्षेत्रातील नवे कौशल्य आत्मसात करून संजीवनी आता जागतिक स्पर्धेत उतरण्यास सज्ज झाली आहे.
कार्यक्रमास व्हाईस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकुर, स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझर डॉ. शांतम शुक्ला, विविध संस्थांचे संचालक, प्राचार्य, डीन व विभाग प्रमुख उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. महेंद्र गवळी यांनी केले तर आभार डॉ. कविथा राणी यांनी मानले.
Post Views:
6





