कोपरगावला ‘टॉप प्रायोरिटी’; प्रत्येक कृषी योजनेत अग्रक्रम – ना.रावलांचा एल्गार”

कोपरगावला ‘टॉप प्रायोरिटी’; प्रत्येक कृषी योजनेत अग्रक्रम – ना.रावलांचा एल्गार”

Kopargaon Given ‘Top Priority’; Precedence in Every Agricultural Scheme – Hon. Raval’s Bold Declaration

शेतकरी भवन ते आंतरराष्ट्रीय मार्केटचा रोडमॅप; बहिष्काराच्या राजकारणावर कोल्हे गटाचा हल्लाबोल

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 29Sun.16.40 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : कोपरगावच्या कृषी विकासाला थेट ‘टॉप प्रायोरिटी’ देत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी “प्रत्येक कृषी योजनेत कोपरगाव बाजार समितीला अग्रक्रम देणार,” अशी ठाम ग्वाही दिली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. रविवारी कोपरगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या भूमिपूजन व सुमारे दहा कोटींच्या कामांच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी कोपरगावचा ‘रोल मॉडेल’ म्हणून गौरव करत मोठा संदेश दिला. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष परागसंधान गणेश कारखान्याची चेअरमन सुधीर लहारे कारखान्याचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर परजणे यासह बाजार समितीचे संचालक भाजपाचे नगरसेवक अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांनी केले.

“९०० कोटींची उलाढाल गाठणारी ही समिती राज्यासाठी आदर्श आहे. त्यामुळेच येणाऱ्या प्रत्येक योजनेत कोपरगाव अग्रस्थानी असेल,” असे रावल ठामपणे म्हणाले. शेतकऱ्यांसाठी सन्माननीय निवास, पाणी, वीज व स्वच्छतेच्या सुविधा देणाऱ्या ‘शेतकरी भवन’ संकल्पनेला त्यांनी राज्यभर गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. ऑनलाईन टेस्टिंग, एकच परवाना आणि जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणीमुळे शेतकरी आता उत्पादकापासून उद्योजक बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कांदा उत्पादकांसाठी ‘कांदा बँक’ आणि आंतरराष्ट्रीय कृषी मार्केट उभारण्याचा रोडमॅपही त्यांनी मांडला.

दरम्यान, कोल्हे गटाने सहकाराच्या लढाऊ परंपरेची आठवण करून देत विरोधकांवर थेट निशाणा साधला. अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे म्हणाले, “रिझर्व्ह बँकेवर मोर्चा, मीटरविरोधी लढा आणि हजारो शेतकऱ्यांचा संघर्ष—हक्कासाठी रस्त्यावर उतरून निर्णय घेतले. पण आज शेतकऱ्यांच्या कार्यक्रमालाच गैरहजर राहणं म्हणजे मतदारांचा अपमान आहे.”

विवेक कोल्हे यांनी अडीच वर्षांत ११ कोटींच्या विकासकामांचा दाखला देत “पारदर्शक कारभार, बिनविरोध निवडणुका आणि शेतकरी केंद्रस्थानी ठेवण्यामुळे कोपरगावचा आदर्श निर्माण झाला,” असे स्पष्ट केले. “शेतकरी मजबूत झाला तर अर्थव्यवस्था भक्कम होते,” हा मंत्र त्यांनी अधोरेखित केला.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही जोरदार हल्लाबोल करत विरोधकांना आरसा दाखवला. “शेतकरी हितासाठी राजकारण बाजूला ठेवणं गरजेचं आहे. ज्यांच्या मदतीने आमदार झाले, त्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्याचीही संस्कृती काहींना राहिली नाही,” असा थेट टोला त्यांनी लगावला. “स्व. अजितदादांनी स्वतः कार्यकर्त्यांचे आभार मानले होते; पण आज गैरहजेरीतून मतदारांचा अपमान केला जातो. काम आम्ही करायचं आणि श्रेय दुसऱ्यांनी घ्यायचं, ही ढोंगी पद्धत आता चालणार नाही,” असे त्यांनी सुनावले.

दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव पत्रिकेतून वगळल्याच्या कारणावरून विरोधी गटाने बहिष्कार टाकत कार्यक्रमाला पाठ फिरवली. माजी आमदार अशोक काळे, आमदार आशुतोष काळे, राजेश परजणे व नितीन औताडे यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वातावरण तापले. “राजकारणाच्या नादात विकासावर पाणी फेरण्याची ही जुनीच सवय,” अशी टीका रंगत असताना, रावल यांच्या घोषणांनी मात्र कोपरगावच्या कृषी विकासाला नवी धार मिळणार, हे स्पष्ट झाले. सूत्रसंचालन सचिव नानासाहेब रणशूर यांनी केले तर शेवटी आभार संचालक प्रकाश गोर्डे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page