कोपरगाव : शहराला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे गाजावाजा करणाऱ्या नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांचे दावे फोल ठरत असून, प्रत्यक्षात नागरिकांच्या नशिबी दूषित व गाळमिश्रित पाणीच येत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील विविध भागांत अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गोदाम गल्ली, गोखरू बाबा गल्ली, बँक रोड, गिरमे चाळ यांसह अनेक ठिकाणी नळातून येणारे पाणी इतके अस्वच्छ आहे की ते पिण्यास तर दूरच, साध्या वापरासाठीही अयोग्य ठरत आहे. सत्ताधारी स्वच्छ पाणी देत असल्याचा दावा करत असताना प्रत्यक्षात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. “निवडणुकीत दिलेली आश्वासने केवळ मतांसाठी होती. नगरपरिषदेचा कारभार म्हणजे ‘बोलाचीच कढी, अन बोलाचाच भात’ ठरला आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
दूषित पाण्यामुळे शहरात विविध आजारांचा धोका निर्माण झाला असून, सत्ताधाऱ्यांचा नियोजनशून्य व हलगर्जी कारभार सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “नगरपरिषद नेमकी कोणत्या भागात स्वच्छ पाणी देत आहे, हा संशोधनाचा विषय आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत नागरिकांनी पाणी वापरण्यापूर्वी ते गाळून व शक्य तितके शुद्ध करूनच वापरावे, असे आवाहन पहाडे यांनी केले. तसेच कोपरगावकरांच्या हक्कासाठी आणि या बेजबाबदार कारभाराविरोधात संघर्ष सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
एकीकडे आश्वासनांचा पाऊस आणि दुसरीकडे दूषित पाण्याचा मारा, या दुहेरी संकटात अडकलेल्या कोपरगावकरांना दिलासा कधी मिळणार, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.