‘रचना स्क्वेअर’मुळे कोपरगावची शान दुणावली; वैभवाला मिळाले नवे परिमाण!
‘Rachana Square’ Doubles Kopargaon’s Pride; Giving Its Grandeur a New Dimension!
नाईक बिल्डर्सच्या ३६ वर्षांच्या प्रवासाचा कळस; १४ मजली उंचीने जिल्ह्याचा मान उंचावला
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 29Sun.13.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : शहराच्या बदलत्या रूपाला नव्या उंचीवर नेणारा ‘रचना स्क्वेअर’ या भव्य आणि देखण्या कमर्शियल इमारतीचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी उत्साहात पार पडले. नाईक बिल्डर्सच्या ३६ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रवासाचा हा एक भव्य टप्पा ठरला असून, जिल्ह्यातील सर्वात उंच १४ मजली निवासी इमारतीच्या भूमिपूजनानेही कार्यक्रमाला वेगळीच दिमाखदार जोड मिळाली.
या प्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी नाईक बिल्डर्सचे प्रमुख प्रसाद नाईक यांच्या कार्याचे कौतुक करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “फक्त इमारती नव्हे, तर माणसं जोडण्याचं काम नाईक बिल्डर्सने केलं आहे.” कोपरगावात फ्लॅट संस्कृती रुजवण्यापासून ते आज तब्बल १८०० हून अधिक कुटुंबांना आधुनिक घरांचा आसरा देण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी उभा केला, हे विशेष उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
“आज कोपरगावात ३० पेक्षा अधिक क्रेडाई नोंदणीकृत बिल्डर्स कार्यरत आहेत. हीच या शहराच्या विकासाची साक्ष आहे. ‘रचना पार्क’, ‘रचना नक्षत्र’, ‘रचना स्क्वेअर’सारख्या प्रकल्पांनी कोपरगावचा चेहरामोहरा बदलून टाकला,” असेही ते म्हणाले.
शहरात दिसणारी आधुनिक जीवनशैली, स्विगी-झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयची वर्दळ आणि मुंबईसारख्या सुविधा आता कोपरगावात उपलब्ध होत असल्याचे चित्र त्यांनी अधोरेखित केले. “ही केवळ इमारतींची उभारणी नाही, तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग उंचावण्याची क्रांती आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
आमदार आशुतोष काळे यांनीही नाईक बिल्डर्सच्या कामाचे कौतुक करताना, “आज उभी राहिलेली ही कमर्शियल इमारत म्हणजे त्यांच्या कारकिर्दीचा कळसच आहे. यापुढेही अशाच भव्य आणि दर्जेदार प्रकल्पांनी कोपरगावच्या विकासात भर घालावी,” अशी अपेक्षा व्यक्त केली. आवश्यक त्या सर्व मदतीचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाचे व्यासपीठावर आमदार आशुतोष काळे, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, नगराध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे क्रेडायचे अध्यक्ष राजेश ठोळे, सतीश पांडे आदींसह शहरातील परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
नाईक बिल्डर्सच्या या भव्य प्रकल्पाने कोपरगावच्या विकासगाथेत आणखी एक सुवर्ण पान जोडले असून, ‘रचना स्क्वेअर’मुळे शहराच्या प्रगतीला नवे आयाम मिळणार असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
त्यावेळी बोलतांना नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले की, नाईक बिल्डर्स आणि पांडे परिवार यांनी उभारलेली ही भव्य इमारत आज कोपरगाव शहराच्या वैभवात लक्षणीय भर घालणारी ठरली आहे. प्रसाद नाईक यांचे काम म्हटले की गुरुद्वारा रोड, साई सिटीसारख्या भागांमध्ये उभारलेल्या प्रत्येक इमारतीने शहराच्या प्रगतीला नवा आयाम दिला आहे. त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक प्रकल्पात केवळ बांधकाम नाही, तर शहराचा दर्जा उंचावण्याची दृष्टी दिसून येते. आज उभी राहिलेली ही इमारत तर कोपरगावचा ‘आयकॉन’ ठरत असून तिच्या आकर्षक लँडस्केप, उठावदार एलिव्हेशन आणि सुयोग्य नियोजनामुळे ती वेगळी ओळख निर्माण करते. प्रसाद नाईक आणि दिनार (दादा) कुदळे यांनी केलेले सूक्ष्म नियोजन, दर्जेदार अंमलबजावणी आणि आधुनिकतेचा समन्वय यामुळे हा प्रकल्प केवळ इमारत न राहता शहराच्या अभिमानाचा विषय बनला आहे.
यावेळी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी आपल्या रोखठोक शैलीत बोलताना प्रसाद नाईक यांच्याबद्दल स्पष्ट मत व्यक्त केले. “नाईक साहेबांचा स्पष्टवक्तेपणा जसा ठळकपणे जाणवतो, तशी झलक प्रसादमध्ये अजून दिसली नाही; पण एक प्रामाणिक, कामाला वाहिलेला आणि दर्जेदार काम करणारा बिल्डर मात्र त्याच्यात नक्कीच दिसतो,” असे सांगत त्यांनी थेट भाषेत कौतुकाची पावती दिली. “प्रसादजींच्या प्रत्येक उपक्रमात आमचा सहभाग असेलच असे नाही, पण आमच्या शुभेच्छा कायम त्यांच्या पाठीशी आहेत; ते हाक देतील तेव्हा आमचा खारीचा वाटा उचलायलाही आम्ही तयार आहोत,” असा शब्दही त्यांनी दिला. प्रसाद नाईक यांच्या मातोश्रींचा उल्लेख करताना त्यांनी भावनिक सूर लावत, “मागे मायेचा हात असेल, तर डोंगरही पार करता येतात. वडिलांनंतर आईला केंद्रस्थानी ठेवून प्रसादने जपलेली ही जाणीव कौतुकास्पद आहे,” असे सांगितले. तसेच या प्रकल्पात स्थानिकांना संधी दिल्याचा धागा पकडत, “कोपरगावचा पैसा कोपरगावातच फिरला पाहिजे, हीच खरी विकासाची दिशा,” असा थेट संदेश देत त्यांनी आपल्या भाषणाला प्रभावी कलाटणी दिली.
प्रास्ताविक करताना ‘रचना स्क्वेअर’ या भव्य कमर्शियल प्रकल्पाचे शिल्पकार प्रसाद नाईक यांनी आपल्या ३६ वर्षांच्या प्रवासाचा भावनिक आणि प्रेरणादायी आढावा घेतला. सुरुवातीच्या टप्प्यातील संघर्ष, वडिलांचे मार्गदर्शन, कुटुंबाचा पाठिंबा याचा उल्लेख केला.पुढे बोलतांना प्रसाद नाईक यांनी बिल्डर क्षेत्रात दिशा दाखवणारे स्वर्गीय पूरब कुदळे या जिवलग मित्राच्या आठवणींना भावनिक उजाळा दिला.त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा आत्मविश्वास मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर दिनार कुदळे यांनी दिलेली उभारी, साथ आणि वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यामुळेच अनेक कठीण टप्पे पार करता आले, असे सांगत त्यांनी त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.आणि कोपरगावकरांनी दाखवलेला विश्वास यांची आठवण करून देत त्यांनी या यशामागील प्रत्येक हाताचे मनापासून स्मरण केले. “हा प्रवास माझा एकट्याचा नाही, तर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे,” असे सांगत त्यांनी सहकारी, ग्राहक, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांचे ऋण व्यक्त केले. ‘रचना स्क्वेअर’ उभारताना मिळालेल्या या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्मरण करत त्यांनी यशामागील टीमवर्क अधोरेखित केले सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले
माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी यावेळी नाईक बिल्डर्सचे संस्थापक नाईक साहेब यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या शिस्तप्रिय, कठोर आणि नियोजनबद्ध कारभाराचा उल्लेख केला. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळेच त्यांचा दरारा होता, आणि तोच गुण प्रसाद नाईक यांच्यातही जाणवतो, अशा शब्दांत त्यांनी प्रसादच्या कार्याचे कौतुक केले.
याचवेळी ज्येष्ठ दत्तू नाना कोल्हे यांनी नाईक साहेबांसोबतच्या मैत्रीच्या आठवणी सांगत प्रसादने उभारलेल्या भव्य प्रकल्पाचे मनापासून अभिनंदन करत त्याला शाबासकी दिली.
आभार प्रदर्शन करताना दिनार कुदळे यांनी ‘रचना स्क्वेअर’ उभारताना जागामालक पांडे परिवारांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “ही संधी केवळ प्रकल्प नव्हती, तर आमच्यावर ठेवलेला विश्वास होता,” असे सांगत त्यांनी या प्रवासातील चढ-उतारांना उजाळा दिला. या यशामागे उभ्या असलेल्या इंजिनिअर्स, कामगार, कर्मचारी आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीचा विशेष उल्लेख करत त्यांनी सर्वांचे मनापासून कौतुक केले. तसेच उपस्थित मान्यवर आणि सहकाऱ्यांचे आभार मानत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सूत्रसंचालन मोरे सर यांनी केले.
Post Views:
2











