“पाणी-रस्ते-वीज-गटारावरच विकासाचा पाया; कोपरगावला एकत्रित नेतृत्वाची गरज” – विवेक कोल्हे यांचा टोला
“The Foundation of Development Rests Solely on Water, Roads, Electricity, and Drainage; Kopargaon Needs United Leadership” — Vivek Kolhe’s Jibe
230 कोटींची गटार योजना, 200 कोटींचे रस्ते, अंडरग्राउंड वीज प्रस्ताव; शास्ती माफीत कोपरगाव मागेच का?
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 29Sun.18.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : “आजच्या काळात रोटी, कपडा, मकान पुरेसे नाही; शहर खऱ्या अर्थाने विकसित करायचे असेल तर पाणी, रस्ते, वीज आणि गटार या चार गोष्टींचा मजबूत पाया आवश्यक आहे,” असा ठाम सूर मांडत विवेक कोल्हे यांनी स्थानिक विकासावर थेट भाष्य केले. केंद्र-राज्य सरकारच्या योजनांमुळे धान्य व घरकुल उपलब्ध होत असताना आता मूलभूत सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात २३० कोटी रुपयांच्या अंडरग्राउंड गटारीचे काम सुरू असून, मध्यंतरीच्या अडचणी दूर करत डिझाईनमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, २०० कोटी रुपयांच्या डीपी रस्त्यांचा आराखडा तयार असून टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे जाळे उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरातील ओव्हरहेड वीज लाईन्स भूमिगत करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पाणीटंचाई हा कोपरगावचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याचे अधोरेखित करत, “नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा देण्यासाठी अधिक ठोस उपाययोजना कराव्या लागतील,” असे त्यांनी नमूद केले. विद्यमान फिल्टरेशन प्लांटची क्षमता अपुरी पडत असल्याने त्यात सुधारणा करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शास्ती माफीच्या मुद्द्यावर त्यांनी प्रशासनावर अप्रत्यक्ष टीका करत, “इतर शहरांना १००% माफी मिळते, मग कोपरगावला का नाही?” असा सवाल उपस्थित केला. “आम्ही सत्ताधारी पक्षात असलो तरी सत्तेत नाही; त्यामुळे फाईल पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी राजकीय वास्तवही मांडले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ध्या एकरात एक कोटींचा ‘नमो पार्क’ सप्टेंबरपर्यंत उभारला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. शेवटी, “कोपरगावचा विकास करायचा असेल तर मतभेद बाजूला ठेवून एकत्रित काम करणे हाच एकमेव पर्याय आहे,” असा दमदार संदेश त्यांनी दिला.
Post Views:
2






