गढूळ पाण्यावरून राजकारण; कामांना गती दिल्याने विरोधकांचा ‘गेम’ बिघडला
Politics Over Murky Water; Expedited Work Thwarts Opponents’ Strategy
नगरपरिषदेची ठोस भूमिका; “जनतेला स्वच्छ पाणी, विरोधकांना राजकीय पाणी!”
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 30Mon.11.30 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : शहरातील गढूळ पाण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सुरू केलेल्या टीकेला नगरसेविका सोनल अजमेरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत राजकारणाचा पर्दाफाश केला आहे. “जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर काम करण्याऐवजी विरोधक केवळ अपप्रचार करत आहेत. प्रत्यक्षात नगरपरिषदेने गेल्या दोन महिन्यांत पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठे सुधारकार्य केले असून पाण्याची गुणवत्ता लक्षणीयरीत्या उंचावली आहे,” असा ठाम दावा त्यांनी केला.
नगराध्यक्ष पराग संधान यांच्या नेतृत्वाखाली नव्या पदाधिकाऱ्यांनी सत्तेची सूत्रे हाती घेताच पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम सुरू केले. पूर्वीच्या प्रशासकीय काळात लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शहरवासीयांना अस्वच्छ पाण्याचा गंभीर त्रास सहन करावा लागत होता. मात्र, त्याच फिल्टरेशन प्लांटची प्रत्यक्ष पाहणी करून सध्याच्या टीमने उणिवांवर थेट बोट ठेवले आणि त्यावर तातडीने उपाययोजना केल्या.
“आज पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे, म्हणूनच विरोधकांचा अपप्रचार फसला आहे,” असा टोला अजमेरे यांनी लगावला. “ज्यांनी स्वतःच्या काळात गढूळ कारभार करून ठेवला, त्यांना आता स्वच्छतेचा त्रास होतो आहे,” असा घणाघात करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
दरम्यान, प्रभागात झालेल्या विकासकामांचे श्रेय सोशल मीडियावर घेणे आणि नंतर पालिकेत येऊन निवेदनाचे नाटक करणे, असा दुटप्पीपणा काहींकडून सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. “जनता सर्व पाहते आहे. कोण काम करते आणि कोण नुसते राजकारण करते, याची पूर्ण जाणीव नागरिकांना आहे,” असेही त्या म्हणाल्या.
गेल्या काळात पाण्याचा प्रश्न चिघळवून ठेवणाऱ्यांकडूनच आज सुधारलेल्या व्यवस्थेवर टीका होत असल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “स्वच्छ पाण्यातही गढूळ राजकारण करण्याची हौस काहींना आवरत नाही,” असा टोमणा मारत अजमेरे यांनी विरोधकांच्या मानसिकतेवर प्रहार केला.
“नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रशासन सक्षम आहे. कामे सुरू आहेत आणि परिणामही दिसत आहेत. मात्र, ज्यांचे दिवास्वप्न भंग झाले आहे, त्यांनी केवळ राजकारणासाठी आरोप करणे थांबवावे; अन्यथा जनतेकडून योग्य उत्तर मिळेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
एकूणच, गढूळ पाण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात आता ‘काम विरुद्ध अपप्रचार’ अशी सरळ लढत उभी राहिली असून, जनतेचा कल कोणाकडे झुकतो हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
Post Views:
3