शासन म्हणते बंद पाईप… मग उघड्या कालव्यांचा हट्ट कशासाठी?
The government advocates for closed pipes… so why the insistence on open canals?
जनतेच्या आरोग्याशी तडजोड मान्य नाही; बंदिस्त पाईपलाईनसाठीच प्रयत्न — नगराध्यक्ष पराग संधान
कोपरगावच्या पाणीप्रश्नावर नव्या चर्चांना उधाण
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन, Jun4Thu 16.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : (राजेंद्र सालकर)“शुद्ध पाणी हा नागरिकांचा अधिकार आहे आणि ते सुरक्षित पद्धतीनेच घरापर्यंत पोहोचले पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका नगराध्यक्ष पराग संधान यांनी पत्रकार परिषदेत मांडत कोपरगावसाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारेच पाणीपुरवठा व्हावा यासाठी नगरपालिका प्रयत्नशील असल्याचे जाहीर केले. शासनाच्या नव्या जीआरमध्येही बंदिस्त पाईप प्रणालीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आल्याने आता “उघडा कालवा की बंद पाईपलाईन?” हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
शासनाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये उघड्या जलवाहिन्यांमुळे निर्माण होणारे गंभीर धोके स्पष्टपणे नमूद केले आहेत. उघड्या कालव्यांमध्ये शेतातील रासायनिक खते, कीटकनाशके, सांडपाणी तसेच विविध संसर्गजन्य घटक मिसळण्याचा मोठा धोका असतो. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात या धोक्याची तीव्रता अधिक वाढते. त्यामुळे बंदिस्त पाईपलाईन ही केवळ विकासाची सुविधा नसून सार्वजनिक आरोग्य सुरक्षेची अत्यावश्यक गरज बनली आहे.
जलविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दाखला देत नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्पष्ट केले की, शुद्धीकरण केंद्रातून निघणारे पाणी जसेच्या तसे सुरक्षित अवस्थेत नागरिकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर बंदिस्त पाईप प्रणाली हाच सर्वात परिणामकारक पर्याय आहे. उघड्या कालव्यांतून पाण्याची चोरी, बाष्पीभवनामुळे होणारी नासाडी आणि प्रदूषणाचा धोका कायम राहतो. त्याउलट बंदिस्त पाईपलाईनमुळे पाण्याची गुणवत्ता अबाधित राहते आणि वितरण व्यवस्थेत शिस्त निर्माण होते.
दरम्यान, शासनाने स्वतः बंदिस्त पाईप प्रणालीची शिफारस केल्यानंतरही उघड्या कालव्यांचा अट्टाहास धरणे किंवा सुरक्षित पाईपलाईन व्यवस्थेला विरोध करणे, हा केवळ राजकीय श्रेयवादाचा भाग ठरू शकतो, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. विकासाच्या नावाखाली जर जनतेच्या आरोग्याशी तडजोड होत असेल, तर तो थेट जनतेशी द्रोहच ठरेल, अशी भावना अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे.
कोपरगावच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याबाबत आता नवा प्रश्न चर्चेत आला आहे. नांदूर मधमेश्वरमार्गे दारणा धरणाचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे आणायचे की निळवंडे प्रकल्पाचे पाणी सुरक्षित बंद पाईपमधून शहरात आणायचे, यावर विविध स्तरांत चर्चा रंगू लागली आहे. मात्र कोणतीही योजना असो, “उघडा कालवा नको; सुरक्षित बंदिस्त पाईपलाईनच हवी,” अशी भूमिका आता अधिक ठामपणे पुढे येताना दिसत आहे.
चौकट : “दारणा की निळवंडे?” — कोपरगावच्या पाणीप्रश्नावर नवा वाद
नगराध्यक्ष पराग संधान यांनी बंदिस्त पाईपलाईनद्वारेच पाणी आणण्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता कोपरगावमध्ये नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. नांदूर मधमेश्वरमार्गे दारणा धरणाचे पाणी आणायचे की निळवंडे प्रकल्पाचे पाणी शहरासाठी वापरायचे, यावर मतमतांतरे सुरू झाली आहेत. मात्र शासनानेच बंदिस्त पाईप प्रणालीची शिफारस केल्यानंतर “उघडा कालवा” हा आग्रह नेमका कोणाच्या हितासाठी? असा सवाल आता नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे.
Post Views:
16





