वादळी पावसाने पिके भुईसपाट ; नुकसानीच्या प्रमाणात मदत मिळावी – शिवसेनेची मागणी
वृत्तवेध ऑनलाइन। 7 Sep 2020
By: Rajendra Salkar, 15.00
कोपरगाव : तालुक्याच्या पूर्व व दक्षिण भागात रविवारच्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे उभी पिके भुईसपाट झाल्याने मोठे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे नुकसानीच्या प्रमाणात मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून सोमवारी (७ सप्टेंबर) रोजी निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले आहे .
कोपरगाव तालुक्यातील पूर्वभागातील करंजी, पढेगाव, कासली, शिरसगाव, तिळवणी, तळेगाव मळे, दहेगाव, लौकी, धोत्रे, खोपडी, भोजडे कान्हेगाव वारी तर दक्षिण भागातील अंजनापुर सोयगाव बहादरपूर धोंडेवाडी वेस रांजणगाव मनेगाव आदी गावांना वादळी वाऱ्याचा व मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला असून शेतातील उभी पिके ऊस, मका, कपाशी, कांदा रोप, बाजरी, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. रविवारी सुमारे दोन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतीची दाणादाण उडवून दिली. या वाऱ्याचा व पावसाचा मुख्यत: फटका काढणीला आलेल्या बाजरी, मका, तूर, कपाशी या पिकांना बसला असून शेतातील हि पिके जमीनदोस्त झाले आहे.काही ठिकाणचे पिका काही ठिकाणचे पंचनामे झाले आहेत परंतु शंभर टक्के नुकसान झाल्याने सर्वच पिकांचे पंचनामे करण्यात यावे तसेच तातडीने नुकसानीच्या प्रमाणात मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देतांना शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे , असलम शेख भरत मोरे , कलविंदर दडियाल , रावसाहेब थोरात अजित सिनगर, विजय भड आदी शिवसेना पदाधिकारी हजर होते.





