त्या ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका – आ. आशुतोष काळे
कोपरगाव : जे ठेकेदार विकासकामे करतांना कामाची गुणवत्ता ठेवत नाही व घेतलेली विकासकामे वेळेत पूर्ण करीत नाही अशा ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका असे सक्त आदेश आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारी तहसील कार्यालयात झालेल्या जनता दरबारात पंचायत समिती प्रशासनाला दिले आहेत.
पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, पशु वैद्यकीय दवाखाना व वळूमाता प्रक्षेत्र आदी विभागाच्या प्रश्नांचा आढावा घेतला.
मागील साडे तीन वर्षात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात वैयक्तिक लाभाच्या घरकुल, शिलाई मशिन, विद्यार्थ्यांसाठी सायकल, कडबा कुट्टी मशिन, झेरोक्स मशीन, रिक्षा वाटप आदी योजनांचा हजारो नागरिकांना लाभ झाला आहे. तसेच दलित वस्ती सुधार योजना, पशु संवर्धन, अंतगर्त रस्ते, भूमिगत गटारी स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालय इमारत, शाळा खोली बांधकाम करणे आदी सार्वजनिक कामांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. यापुढे देखील या योजनेपासून वंचित असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावे. वैयक्तिक लाभाच्या योजनांचे पैसे त्या लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरात लवकर कसे जमा होतील याकडे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. ज्या गावातील विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्या कामांची सद्यस्थिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सबंधित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना वेळच्या वेळी द्यावी. मनरेगा योजनेच्या माध्यमातून अनेक वैयक्तिक व सार्वजनिक विकासकामे केली जावू शकतात. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात मनरेगा योजना गतिमान करण्यासाठी घेतलेल्या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्राधान्याने मनरेगा योजना राबवा. पशु संवर्धन विभागाने जनावरांची योग्य काळजी घेवून लसीकरण मोहीम हाती घ्यावी. लवकरच कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होणार असून बाहेरून पशुधन येणार आहे त्या पशुधनाचे देखील आरोग्य अबाधित राहील याची काळजी घ्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतांना कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुगांचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र अनलॉक सुरु झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हि मोहीम आरोग्य विभागाने प्रभावीपणे राबविल्यामुळे रुग्ण संख्या कमी झाली आहे त्याबद्दल आरोग्य विभागाचे त्यांनी कौतूक केले. कोरोनाची तीव्रता काहीअंशी कमी झाली असली तरी धोका कायम आहे त्यासाठी आरोग्य विभागाने अधिक सतर्क राहून संशयित रुग्णांची माहिती काढावी. नवीन सुरु करण्यात आलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या माध्यमातून रुग्णांवर योग्य उपचार करा अशा सूचना दिल्या. यावेळी पंचायत समिती अंतर्गत मंजूर गाय गोठा योजना व प्रधानमंत्री आवास योजनांचे मंजुरीपत्र आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आले.
या जनता दरबारात विलास खोंड, रावसाहेब टेके, हरी दवंगे, संजय जाधव, सुधाकर होन, छगन देवकर, नानासाहेब नेहे, सचिन वाबळे, बाळासाहेब ढोमसे आदी नागरिकांनी या जनता दरबारात आपल्या समस्या मांडल्या. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, काळे कारखाना उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कारभारी आगवन, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सौ. सोनाली साबळे, सौ. सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, बाजार समिती उपसभापती राजेंद्र निकोले, गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष माधवराव खिलारी, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, प्रशांत वाबळे, सुधाकर होन, दिलीप बोरनारे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर तसेच तालुक्यातील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचलन रमेश गवळी यांनी केले तर आभार जि.प. सदस्या सौ. सोनाली रोहमारे यांनी मानले.
चौकट -: कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून २५ बेडचे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु झाल्यामुळे आज या रुग्णालयात ११ रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या बाह्यरुग्ण सेवा, अंतररुग्ण सेवा, प्रसूती सेवा, क्ष-किरण तपासणी तसेच रक्त तपासणी विविध शस्त्रक्रिया देखील सुरु करण्यात आल्या आहेत.- डॉ. कृष्णा फुलसौंदर (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय)