भ्रष्टाचार थांबता थांबत नाही, गप्प बसुन चालणार नाही तक्रार करा !
Corruption does not stop, it will not remain silent.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 21Jan 2021, 19:20:00

कोपरगाव : शहरातील रस्त्यांची कामे म्हटले की कोपरगाव नगरपालिकेच्या अधिकारी व मर्जितल्या ठेकेदार यांची चांदीच म्हणायची !
दरवर्षी कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे, खड्डे बुजविणेवर लाखो रुपये उधळले जातात. काम काय केले ? कसे केले ? याबाबत कोण काय तपासते ? कुणालाच पत्ता नाही .
पालिकेचा दक्षता व गुणवत्ता विभाग नावालाच आहे. त्यांचे ऑफिस ही अशा ठिकाणी आहे. ते लोकांना दिसणार नाही आणी लोक त्यांना दिसणार नाही. आहे तर मग ते का तपासत नाहीत पालिकेच्या हद्दीतील कोणत्याही रस्त्यावरील या कामांची कॉलिटी, गुणवत्ता, शहरातील अनेक ठिकाणी झालेल्या काँक्रिटीकरण रस्त्यांना दोन ते तीन महिन्यात कोड फुटले आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर डॉक्टर आचारी हॉस्पिटल ते साईनगर या रस्त्याची किती दिवसात वाताहत झाली आहे. शहरातील अनेक डांबरीकरण रस्त्यांचे वाटोळे झाले अशी अनेक उदाहरणे देता येतील कुठेच योग्य काम झालेले नाही. मग कारभारी काय करतात हा प्रश्न येतोच, तरी ना लायक प्रशासन थंड आहे. अशा गुणवत्ता हीन कामाबाबत कोणावर जबाबदारी निश्चीत केली पाहिजे .? याच उत्तर कुणीही देत नाही. ज्यांना जनतेनी खुर्चीवर बसवलं त्यांना ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाका म्हटले, तर ते म्हणतात आम्ही वाईटपणा कसा घ्यायचा, करदाते नागरीक मात्र कधी धुळ तर कधी हात पाय गमावून अनेकांना मणक्याचे, मानेच्या आजार झाले हे सर्व जण दिलेल्या कराचे फळ भोगत आहेत.
रस्ता आणी लेवल, उतार कुठेच सारखी दिसणार नाही . अगदी खड्डा भरताना , खड्डा जावुन रस्त्यात टेकड्या तयार केल्यात, नवा रस्ता केला तरी ठिकाणी रस्त्यावर पाणी साचते कसे ? मटेरीयल ची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा पालिका अधिका-यांन्याच माहित .
नगराध्यक्ष नगरसेवक आरोप-प्रत्यारोपाच्या जुगलबंदीत गुंतलेले असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर गेल्या दोन दिवसापूर्वी कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू झाले आहे. आनंदाची बाब म्हणजे २०१७ साली भरलेले टेंडर असून बिच्चारे ठेकेदाराने शहरातील नागरिकांची दया आल्याने हे काम तब्बल चार वर्षांनंतर म्हणजे २०२१ मध्ये त्याच दराने सुरू केले आहे. त्याबद्दल ठेकेदाराचे विशेष अभिनंदन करावयास पाहिजे, कारण चार वर्षांपूर्वीच्या दरात आज काम करणे म्हणजे धाडस आहे. त्या धाडसाबद्दल त्याचा सत्कार केला पाहिजे. करण अधिकाऱ्यांशी बोलावे तर ते म्हणतात आम्ही काम करून घेत आहोत, काम होऊ द्या अशी उपकाराची जाणीव करून दिली जाते.
शहर अभियंत्यांना विचारणा केली असता काहीच बोलत नाहीत. मुख्याधिकारी यांना ही विचारले तर ते ही गप्प कदाचीत आम्ही कोण विचारणारे असे या अधिका-र्यांच्या मनात येत असेल. तर त्यांनी समजुन घ्यावे, आम्ही करदाते नागरीक आहोत. पोरा बाळांच्या पोटाला चिमटे घेऊन आम्ही करापोटी भरलेले पैसे कसे व कोणाचे पोट भरण्यात वाया जात आहेत. हे गप्प बसून बघू शकत नाही. त्यामुळे प्रश्न विचारतोय, आणी हे प्रश्न सर्व करदात्यांच्या मनातले आहेत .
दरवर्षी नाले सफाईत पण कसे पैसे वाया जातात ते, करदाते नागरीक पाहत आहेत .या पण कामाची गुणवत्ता तपासण्याची तसदी घेतली जात नाही .
लाखो करोडो रुपये जिथे दरवर्षी खर्च करतो तेव्हा , पालिकेच्या किंवा त्रयस्त यंत्रणेकडून तपासणी केली पाहिजे. तसेच यासर्वकामाचे सोशल ऑडिट पण झाले पाहिजे .
फक्त बिल काढण्यापूरते टिपिकल टीपण्या मंजुरीचा खेळ बस्स झाला .
नागरीकांचे मेहनतीचे पैसे ,गचाळ गटारे नाले निकृष्ट दर्जाची कामे मूलभूत सुविधांचा अभाव यांच्या विळख्यात राहण्यासाठी कर रुपाने देत नाहीत. तसेच रस्त्यावरील खड्डे भरणे पेव्हर ब्लॉक आणी जीवघेण्या टेकड्या तयार करण्यासाठी देत नाहीत. चार वर्षांपूर्वी मंजूर झालेली कामे आज केली जातात याचा अर्थ काय समजायचा ? हे मुख्याधिकारी आणी शहर अभियंता यांनी लक्षात घ्याव .थोडी तरी जनाची नाही तर मनाची असेल तर ठेकेदाराचे बिल काढण्या आधी गुणवत्ता तपासणी करा,आणी लोकांनाही रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात झाल्यास संबधीतांच्या नावाने पोलीसात रितसर तक्रार करा, वेळ नाही म्हणून सोडून देवू नका, हवा तर गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क करा, कोट्यावधी रुपये अशा पध्दतीने ,वाया घालवले जातात, हिशोब कुणाकडे मागायचा , आणी कुणी मागायचा ? आम्ही ही जबाबदारी आपल्या नगरसेवकांना दिलीय. पण ते तर आरोप-प्रत्यारोपात गुंतलेले, पण ते जर करु शकत नसतील तर आम्ही आमच्या कर रुपाने दिलेल्या पैशासाठी,तक्रार केली पाहिजे , बोलल पाहिजे. काल परवाच्या भांडणात कामांच्या मोबदल्यात कारभाऱ्यांना मिळणारी टक्केवारी ऐकून थक्क होण्याची पाळी आली. निवडणुकीत पैसे वाटा, सत्ता मिळवा सत्तेतून पैसा मिळवा व पुन्हा निवडून या हे दुष्टचक्र मोडले पाहिजे. पाचशे रुपयात आपला स्वाभिमान आणि हक्क गमावू नका ! लाखो लोकांच्या जीवाशी खेळून जर काही बोटावर मोजणारे ठेकेदार, अधिकारी व कारभारी गब्बर होणार असतील तर आता कोपरगाव शहरात होणाऱ्या प्रत्येक कामावर नागरिकांनी बारकाईने लक्ष देऊन आपल्या पैशातून होणारे काम दर्जेदार व टेंडर प्रमाणे होते की नाही याची चौकसबुद्धी ठेवली पाहिजे .





