वैभव मांगले यांच्या वक्तव्याचा पुजारी व गुरव’समाजाकडून निषेध- ॲड. अण्णासाहेब शिंदे
Vaibhav Mangle’s statement protested by priests and Guru’s community – Adv. Annasaheb Shinde
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 21March 2021, 10 :00
कोपरगाव : देवाच्या अस्तित्वावर व मंदिरातील पुजाऱ्यांच्या सेवेवर शंका उपस्थित करून वक्तव्य करणाऱ्या अभिनेता वैभव मांगले याचा अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने शनिवारी (२०) रोजी संस्थापक अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांनी जाहीर निषेध केला आहे.
देव अस्तित्वात नाही…हे पुजाऱ्याला माहीत असते.त्यांच्यासाठी हे केवळ पैसे कमावण्याचे साधन आहे.म्हणूनच हे लोक सामान्य माणसाला देवपूजेच्या आहारी घालून गडगंज श्रीमंत होतात. असे वक्तव्य करून मांगले यांनी देवाच्या अस्तित्वाबरोबरच खेडोपाडी काहीही उत्पन्न नसताना गुरव व पुजारी वर्ग देवाची मनोभावे पूजा अर्चा करीत असताना त्यांच्या सेवेबद्दल शंका उपस्थित करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या. मंदिरातील गुरव पुजारी गावातील सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक वातावरण निर्मिती करत असतात. देवाला सातत्याने उजेडात ठेवणारा गुरव आज स्वातंत्र्यानंतरही स्वतःचे अस्तित्व राजकीय व सामाजिक पटलावर शोधत आहे. गावोगावी आज अनेक अडचणींना सामोरे जात आहे. ट्रस्टच्या माध्यमातून देवासमोरचे उत्पन्न मिळण्यास आडकाठी निर्माण केली जात आहे. गावगुंड यांच्याकडून देवस्थान इनामी जमीन बळकवण्याचे काम जोरात चालू आहे.गुरव पुजाऱ्यांना मारहाण होत आहे.पुजारी हलाखीचे व गरिबीचे जीवन जगत आहे. एकीकडे आम्ही शासन दरबारी आमच्या हक्कासाठी लढत आहोत, पण तेथे आम्हाला न्याय मिळत नाही. आमच्यावर सातत्याने अन्याय होत आहे. असे असतानाही हजारो वर्षापासून पुजारी म्हणून आम्ही मंदीरातील देवाची नियमित पूजाअर्चा करीत असताना आमच्या प्रामाणिक सेवेबद्दल आपण केलेल्या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. आपल्या हिंदूद्वेषी व देवविरोधी भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.आपण आपले विधान मागे घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्हाला आपल्याविरोधात आंदोलन करावे लागेल.असा स्पष्ट इशारा अखिल भारतीय गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांनी दिला आहे .





