दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ३८.६३ कोटी निधी मंजूर-आ.आशुतोष काळे
38.63 crore sanctioned for civil court building – MLA Ashutosh Kale
कोपरगाव : शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या ब्रिटीशकालीन इमारतींची दुरावस्था झाली होती. त्या ठिकाणी नवीन इमारतीसाठी निधीची मागणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत विधी व न्याय विभागाकडून ३८ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरातील न्यायालयाच्या इमारती मोडकळीस आलेल्या या इमारतीचा काही भाग कोसळला असल्याने न्यायदानाच्या प्रक्रीयेत अडचणी येत असल्याचे सांगत न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांच्याकडे वकील संघाच्या सदस्यांनी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन विधी व न्याय खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे त्यांची भेट घेऊन आ.आशुतोष काळे यांनी न्यायदान प्रक्रियेला व विधी तज्ञांना अनंत अडचणी येत आहे. या इमारतींचे बांधकाम होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले होते व न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी द्यावा अशी मागणी केली होती. मात्र कोरोना संकटामुळे विकासकामांना निधी मिळण्यात अडचणी येत होत्या.मात्र कोरोनाची दुसरी लाट मागील काही महिन्यापासून ओसरल्यामुळे अर्थव्यवस्था रुळावर येताच मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाच्या इमारतीसाठी ३८ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना.अजित पवार,विधी, न्याय राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे आभार मानले आहे.





