गोदावरी नदीवरील वारी पुलासाठी २० कोटी निधी मंजूर- आ. आशुतोष काळे
20 crore fund sanctioned for Wari bridge on Godavari river. Mla.Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 22 Dec.2021 19.50Pm.
कोपरगाव: २०१४ ला झालेल्या सत्तांतरामुळे गोदावरी नदीवरील वारी पुलाचे मा.आ.अशोक काळे यांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते त्याचा पाठपुरावा करून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या पुलासाठी २० कोटी रुपये मंजूर करून घेतले असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील (प्रजिमा १३ वरील) सावळीविहीर, रुई, वारी-कान्हेगाव, सडे, शिंगवे, भोजडे, शिरसगाव, सावळगाव आदी गावातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला वारी येथील गोदावरी नदीच्या पुलाचा प्रश्न मागील पाच-सहा दशकांपासून प्रलंबित होता. पावसाळ्यात गोदावरी नदीचा विसर्ग वाढल्यानंतर पुलावर पाणी येऊन दोनही बाजूंची वाहतूक ठप्प होत असे. विद्यार्थ्यांना घरीच राहावे लागत होते.तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून शिर्डी येथे साई पालख्यांसमवेत येणाऱ्या हजारो साईभक्तांची देखील या पुलामुळे गैरसोय होत होती. यासाठी तत्कालीन आमदार अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र २०१४ ला सत्तांतर झाल्यामुळे वारी पुलाचा प्रश्न प्रलंबितच होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांनी वारी येथील पुलाचा प्रश्न सोडविणार असल्याचे सांगून परिसरातील नागरिकांना आश्वासित केले होते.
वारी पुलासाठी २० कोटी मंजूर झाल्याबद्दल त्याबद्दल आ.काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्ता भरणे यांचे आभार मानले आहे.
चौकट :-
आ.आशुतोष काळे यांनी वारी-कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजना व वारी पुलाचा प्रश्न दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सोडविला. त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून याचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होणार आहे. परंतु त्याचबरोबर माजी आ.अशोकराव काळे यांचे वारी पुलाचे स्वप्नदेखील आ.आशुतोष काळे यांनी दोनच वर्षात पूर्ण करून दाखविले आहे.





