शाळांच्या गुणवत्तेसाठीची संकल्पना, चोखपणे राबविली जावी- विभागीय आयुक्त गमे

शाळांच्या गुणवत्तेसाठीची संकल्पना, चोखपणे राबविली जावी- विभागीय आयुक्त गमे

Concept for quality of schools should be implemented accurately – Divisional Commissioner

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 22 Dec.2021 19.40Pm.

कोपरगाव : ग्रामीण भागातील मुला – मुलींमध्ये ज्ञान मिळविण्याची प्रचंड क्षमता आहे. शाळांच्या गुणवत्ता वाढविण्यासाठीची संकल्पना, आखणी व अंमलबजावणी चोखपणे होणे गरजेचे आहे असे आवाहन नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संवत्सर येथे पद्मभूषण खा. डॉ. ए.वि. तथा बाळासाहेब विखे पाटील शैक्षणिक सभागृहाच्या शुभारंभ प्रसंगी केले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई पाटील या अध्यक्षस्थानी होत्या.

यावेळी शाळेतील मुलींना महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत साकलींचे वाटप, माझी वसुंधरा प्रकल्पांतर्गत फळवृक्ष लागवड, गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दूध उत्पादकांना अनुदानावर दूध काढणी यंत्रांचे वितरण, डिजिटल दाखले व सातबारा वितरणाचा शुभारंभ, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप, महानुभाव आश्रम मंदीर परिसरात वृक्षारोपन असे विविध उपक्रम पार पडले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे, जिल्हा शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंदराव शिंदे, तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गट शिक्षणाधिकारी पोपटराव काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, वृक्ष लागवड अधिकारी सौ. रक्ताटे, सरपंच सौ, सुलाचना ढेपले, उपसरपंच विवेक परजणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 

वि.आयुक्त राधाकृष्ण गमे पुढे म्हणाले, मुलांमध्ये मूल्यशिक्षण, बौध्दिक क्षमतावृध्दी, शारीरिक विकास, सामाजिक जाणिवा निर्माण करताना शिक्षकांनी प्रचलित चौकट व जाचक नियमावली बाजुला ठेऊन प्रयोगशिलतेवर अधिक भर देण्याची गरज आहे. पारंपारिक शिक्षणाबरोबरच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावरही शिक्षकांचा कल असायला हवा. स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांचा सामाजिक, शैक्षणिक कार्याचा वारसा राजेश परजणे यांनी पुढे चालविला असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदृष्टी देण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संभाषण व लेखन कौशल्य, विविध पुस्तकांचे वाचन करायला लावणे गरजेचे आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास होण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्यावतीने शाळेसाठी एक दिवस हा उपक्रम राबवीत आहोत. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस जिल्हयातील शाळेची पाहणी करुन शाळेची परिस्थिती जाणून घेणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू सांगीतले.

सौ. शालिनीताई विखे म्हणाल्या,. माझ्या अध्यक्षपदाच्या काळात आम्ही ग्रामीण शिक्षणाला अधिक महत्व दिले. पोपटपंची शिक्षणाला दूर करुन मूल्याधिष्ठीत शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचा आम्ही सतत प्रयत्न केला. शाळेचे मालक,चालक, पालक आणि बालक यांचा योग्य समन्वय साधून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आज खाजगी शाळांमधून जिल्हा परिषदांच्या शाळांकडे मुले येत आहेत ही अतिशय समाधानाची बाब असल्याचेही त्या  म्हणाल्या.

कार्यक्रमास लक्ष्मणराव परजणे, खंडू फेपाळे, चंद्रकांत लोखंडे, केशवराव भाकरे, सोमनाथ निरगुडे, बाबासाहेब परजणे, दिलीप ढेपले, हबीबभाई तांबोळी, सुभाष डरांगे,बाळासाहेब दहे, लक्ष्मणराव शिंदे, दिलीपराव दाणे, शिवनाथ खिलारी यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे व शिक्षण विस्तार अधिकारी सौ. शबाना शेख यांनी केले तर गट शिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page