पत्रकारिता ही धर्मदाय संस्था नाही तर सामाजिकतेचे भान असलेला खाजगी उद्योगच आहे – विश्वास देवकर
Journalism is not a charity but a social enterprise with a sense of community – Vishwas Deokar
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir 7 Jan.2022 16.00Pm.
कोपरगाव : आज पत्रकाराला व्यवसायाचे एक लक्ष दिले जाते. यात त्याची घुसमट होत असली तरीही त्या व्यवस्थेविषयी अनादर करण्याचे काही कारण नाही कारण त्यांना सुद्धा त्यांच्या व्यवस्था चालवायच्या आहेत या व्यवस्था चालविण्यासाठी म्हणून अर्थकारण नावाची जी गोष्ट करावयाची असते ती गोष्ट ते करत आहेत. कारण पत्रकारिता ही काही धर्मदाय संस्था नाही हे खाजगी आहे हा उद्योगच आहे परंतु आमच्या उद्योगाला सामाजिक तेच भान आहे. असे परखड विचार माजी संपादक विश्वास देवकर यांनी संजीवनी उद्योग समूह व संजीवनी शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयोजित गुरुवारी ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी संजीवनी अभियांत्रिकीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते.
यावेळी व्यासपीठावर संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, सचिव अंबादास अंत्रे विश्वस्त सुमित कोल्हे हे होते. प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांनी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार प्राध्यापक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन केले.
विश्वास देवकर पुढे म्हणाले, व्यवस्था चालविण्यासाठी म्हणून अर्थकारण नावाची जी गोष्ट करावयाची असते ती गोष्ट ते करत आहेत.त्यामुळे त्याच्याबद्दल अनादर व्यक्त करणारं नाही हे मान्य करून हा उद्योगच आहे खाजगी आहे. त्यामुळे त्याला नफा तोट्याचे गणित सांभाळावच लागेल अन्यथा ज्या बाळशास्त्री जांभेकरांनी चालू केलेले दर्पण हे वृत्तपत्र आज जिवंत नाही, ते आज इतिहास जमा झाले याची चिकित्सा आम्हाला करावी लागेल. ज्यांनी इतिहास रचला अशी कितीतरी मोठी प्रभावळ आहे. जी इतिहास जमा झाली आहे. खरे म्हणजे मुल्ये होती, तत्वनिष्ठ होत्या, सामाजिकतेचा आविष्कार होता. स्वातंत्र्यपूर्व काळात हे सर्व लढलेले आहेत. स्वातंत्र्यासाठी पण ते काळाच्या पडद्या आड गेले आहेत. मग तो मराठा असो दर्पण असो अशी कितीतरी नावे घेता येतील. केसरी सारखं वर्तमानपत्र आज चॅरीटेबल ट्रस्ट होऊन तग धरून राहिला आहे. असे त्यांनी सांगितले.
विश्वास देवकर पुढे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यांनी लढण्यासाठी आपल्या शब्दांचे बाण फेकले आणि इतिहास घडविला आहे. तो इतिहास पुढे जगण्याचं जागविण्याचे काम का झालं नाही ?, याचे आत्मचिंतन आम्ही करतो मग आम्हाला असं वाटत राहतं मूल्यनिष्ठा, तत्त्व सिद्धांत या एकेरी ट्रॅकवर जे चालत राहिले ते इतिहास झाले. ज्यांनी इतिहास निर्माण केला पण तेच इतिहासच झाले आणि ज्यांनी व्यावसायिकतेचा विचार केला नफा तोट्याचे गणित जुळवलं आणि जे काळाच्या प्रवाहानुसारचे बदल अंगीकारत आहेत. आणि प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाचं अवलोकन करून अंगीकार करून जे पुढे जाऊ पाहत आहेत. त्या संस्था मोठ्या होत आहेत. आणि हे अजिबात गैर नाही, राजकारण्याबरोबर जे छापण्याचे किंवा न छापण्याच्या पॅकेजिंग करतात परंतु प्रसंगी आपल्या कर्तुत्वाचा रंग दाखवणे म्हणजे दर्पणकरांना अभिवादन करणं आहे असं मी मानतो.
ज्येष्ठ संपादक देवकर पुढे म्हणाले, पत्रकार हि जमात एका संघर्षाच्या काळात पुढे सुरू आहे आम्ही सर्व संघर्ष करीत आहोत तो संघर्ष आमच्या अस्तित्वाचा संघर्ष आहे. आणि आमच्या अस्मितांचा संघर्ष आहे. विशेषता ग्रामीण भागामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पत्रकार काम करीत आहेत कोरोना च्या काळात त्याचे भयावह स्वरूप आम्ही प्रत्यक्ष पाहिला आहे तुम्ही हि पहिल असेल प्रकारांच्या नोकऱ्या गेल्या त्यांची रोजीरोटी गेली पत्रकारांच्या वाटेला कोरोनाच्या काळात चित्रविचित्र संकटे आली पण अशाही संकटाच्या काळात मध्ये विशेषता ग्रामीण भागामध्ये पत्रकारांनी जे काम केलेले आहे. त्याचा मी साक्षी आहे. त्याचे आज पत्रकाराच्या दिनानिमित्त मी अवलोकन करीत असताना अंतर्मुख होतो आहे महसूल व प्रशासकीय अधिकारी काळामध्ये सर्व सुविधांसह तयार असताना हातात पेन आणि कागद घेऊन माझा पत्रकार लढत होता. लढता लढता मरत होता, आणि मरता मरता ही लढत होता. या कोरोना काळात महाराष्ट्रात किमान पत्रकारांनी आपला जीव गमावला होता. अशा काळात माझी ही पत्रकार मुले कोरोना योध्दा झाली. आपण आज पत्रकारांचा सन्मान करत आहात म्हणून तो आनंद भाव व्यक्त करता करता मीच आज माझ्या दुःखाला डागण्या देऊ पाहत आहे होय माझी नोकरी गेलेली चाहे पत्रकारिता नावाचा धर्म मी पाळतो आहे मला माझ्या समाजासाठी लढले पाहिजे मला माझ्या पत्रिकेत पत्रकारितेसाठी राबलं पाहिजे असं सांगून उपाशीपोटी बाहेर पडणारी कितीतरी पोर मी पाहिली आहे. आज या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो कि तत्व सिद्धांताची लेखणी चालविणारे जे कोणी पत्रकार तुमच्या भागातील अपवाद असतील त्या अपवादांना संरक्षण देण्याचे काम तुम्ही केले पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही यांचे पालक व्हाल, ते पालकत्व तुम्ही घ्यावं असं मी काळजातून आवाहन करतो. एरव्ही आपला देण्याघेण्याचा जो व्यवहार आहे. तो आपल्या दोघांनाही लखलाभ होवो, यात नकाराची कुठली घंटा नाही असेही ते शेवटी म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात बिपीन कोल्हे म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात थोडीशी १ ते २ टक्के माणसे असतात जी वेगळी वाकडी वागतात गेल्या चाळीस वर्षाचा माझा पत्रकारांशी संबध आहे. एकदम चांगल्या पद्धतीची ही पत्रकार मंडळी आहेत मला प्रकर्षाने येथील पत्रकारांमध्ये सकारात्मक भूमिका दिसून आली.
प्रास्ताविक करताना मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे म्हणाले, आपल्याला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतांना अपेक्षा अशीच राहील की, आपणही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करताना जिथे आम्ही चुकत असू तिथे आम्हाला सांगा. आम्ही आपल्या सूचनांचा सकारात्मक विचार करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक साहेबराव दवंगे यांनी व्यक्त केले.