एकोणावीस महिला बचत गटांना ३१ लाखाचे कर्ज वाटप – सौ. चैताली काळे
Distribution of loan of 31 lakhs to nineteen women self help groups – Mrs. Chaitali Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Tur 8 Mar 2022 18:00Pm.
कोपरगाव : प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ संचलित १९ बचत गटांना जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैताली काळे यांच्या हस्ते मंगळवारी महिला दिनी ३१ लक्ष ४ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.
यावेळी चैताली काळे म्हणाल्या, पुढील पिढीला सक्षम करण्यासाठी प्रत्येक महिला झगडत असते. मुलांचे भविष्य घडविण्यासाठी तिची सर्व धडपड असते. कोरोना महामारीत घरबसल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी महिलांनी अनेक गृह उद्योग सुरु केले आहेत. ज्या महिलांना आपल्या उद्योग व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. अशा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी यापुढील काळात जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी करण्यात आलेल्या कर्ज वितरणातून महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करून आपल्या गृह उद्योगाची व्याप्ती वाढवून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन केले.
यामध्ये कार्तिक स्वामी बचत गट (जेऊर पाटोदा), लक्ष्मी कुबेर बचत गट (जेऊर पाटोदा), सप्तशृंगी बचत गट ( माहेगाव देशमुख), कृष्णा बचत गट (कोळपेवाडी), रोझ बचत गट (गवारेनगर, कोपरगाव), गृहिणी बचत गट (कोळपेवाडी), सावित्रीबाई फुले बचत गट (चांदेकसारे), भिमाई बचत गट (सोनेवाडी), जिजाऊ बचत गट (माहेगाव देशमुख), संत रोहिदास बचत गट (कोळपेवाडी), भीमाशंकर बचत गट (कोळपेवाडी), प्रगती बचत गट (कोळपेवाडी), रमाई बचत गट (जेऊर पाटोदा), आराध्या बचत गट (सोनेवाडी), दामिनी बचत गट (सोनेवाडी), खंडोबा बचत गट (माहेगाव देशमुख), आशिर्वाद बचत गट (माहेगाव देशमुख), राधा बचत गट (माहेगाव देशमुख), मुस्कान बचत गट (माहेगाव देशमुख) आदी गटांचा समावेश आहे. यावेळी नगरसेविका श्रीमती वर्षा गंगूले, सौ. माधवी वाकचौरे, सौ.स्वप्नजा वाबळे आदींसह बचत गटांच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, सचिव व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.