शंकरराव कोल्हे यांचे निधनानंतर शहर शिवसेनेचा मोठा निर्णय; शिवजयंतीचे कार्यक्रम रद्द-कैलास जाधव
City Shiv Sena’s decision after Shankarrao Kolhe’s death; Shiv Jayanti big event canceled- Kailas Jadhav
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Thu 17 Mar 2022 13:,20Pm.
कोपरगाव : सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचे निधनानंतर तिथीप्रमाणे २१ मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त होणारे सर्व मोठे कार्यक्रम रद्द केले आहेत. अशी माहिती उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी बुधवारी (१६) दुपारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यापूर्वी शिवसेनेच्या वतीने शंकरराव कोल्हे यांना श्रद्धांजली वाहिली.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचे बुधवारी १६ मार्च रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे राज्यासह संपूर्ण कोपरगाव तालुक्यात शोकाकुल वातावरण आहे. बुधवारी कोपरगाव शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. दुखवटा जाहीर झालेला नसला तरी शंकरराव कोल्हे यांचे कोपरगाव तालुक्यासाठी असलेले योगदान लक्षात घेता कोल्हे परिवाराच्या दुःखात कोपरगाव शहर शिवसेना, युवासेना महिला आघाडी, ग्राहक संरक्षण कक्ष, सहभागी आहोत. शिवजयंतीच्या तयारीत असलेल्या शिवसेनेने आपले सर्व मोठे कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव यांनी पत्रकाद्वारे प्रसार माध्यमांना दिली आहे. याची शिवप्रेमी व सैनिकांनी नोंद घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शहर शिवसेनेच्या वतीने सोमवारी २१ मार्च रोजी तिथीप्रमाणे होणार्या शिवजयंतीनिमित्तचे सर्व कार्यक्रम मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून सालाबाद प्रमाणे शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवरायांना ११ तोफांची सलामी देऊन वैदिक पद्धतीने व पारंपारिक पद्धतीने शिवस्मारक येथे दुग्धाभिषेक करून साजरी करण्यात येणार असल्याचे पत्रक शिवसेनेने बुधवारी दुपारी जारी केले आहे.
या पत्रकावर उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष नितीश बोरुडे, माजी नगरसेवक अनिल आव्हाड, माजी शहरप्रमुख सनी वाघ, ग्राहक संरक्षक मंच शहराध्यक्ष रवी कथले, आदींच्या सह्या आहेत.