लेख- माझा पांडुरंग। माझा साहेब ।।
Article – My Pandurang. My lord
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Thu 24 Mar 2022 16:40Pm.
माझा पांडुरंग म्हणजेच आम्हा गोर गरिबांचे पोशिंदे शंकररावजी कोल्हे. १६ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. परमेश्वराने विचारले असते की, मला शंकरराव कोल्हे यांना घेऊन जायचे आहे, तर मी त्यांना म्हणालो असतो, पृथ्वीतलावर त्यांना अजून खूप काम करायचे आहे. त्यांच्या ऐवजी मलाच घेऊन जा.
वयाच्या २१ व्या वर्षी कामाला सुरूवात करून ९३ व्या वर्षापर्यंत त्यांनी अविरत काम केलं आणि आम जनतेचा निरोप घेतला. जो तो म्हणतो त्यांनी काय काम केले, पण ते गेल्यानंतर त्यांचे काम आम जनतेला दिसले. माणूस गेल्यानंतर त्याची किंमत कळते.
मी चौथी इयत्तेत शिकत होतो. १९७२ चा तो काळ. आमचे वडील शंकरराव कोल्हे यांचे कार्यकर्ते. त्यांचे बोट धरून मी शंकरराव कोल्हे यांचा चाहता झालो, त्यांच्या येसगावच्या जुन्या वस्तीवर जायचो.
१९८०-८५ मध्ये सदगुरू गंगागिर महाराज महाविद्यालयात शिकत असतांना दोन वेळेस ऑल इंडिया व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी झालो. पदवी पुर्ण झाल्यानंतर बीपीएड अभ्यासक्रमासाठी श्रीरामपुर येथे प्रवेश घेतला. १९८६ मध्ये क्रीडा शिक्षक म्हणून डहाणूकर इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये रुजु झालो. त्यावेळी शंकरराव कोल्हे यांचा स्व. गोविंदराव आदिक यांनी सत्कार आयोजित केला होता. मी हया कार्यक्रमाला शाळा सोडुन हजर होतो. हॉकीचे कोच जाधव यांच्या बदलीचे काम होते. मी शंकरराव कोल्हे यांना भेटलो त्यांनी जाधव यांची अडचण समजून घेवून त्यांचे बदलीचे कामही केले.
त्यानंतर १९९० मध्ये मला सेंट्रल एक्साईज इन्स्पेक्टर परिक्षेचा कॉल आला. मी परिक्षेसाठी १२० मुलामध्ये पहिल्या १२ उमेदवारात उत्तीर्ण झालो. त्यावेळेस शंकररावजी कोल्हे राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. मी त्यांना भेटलो त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी लगेच स्विय्य सहाय्यक सावंत यांना संबंधीत विभागाला फोन लावायला सांगितला, फोन लागला नाही. मी बाहेर बसलो. त्यावेळी आताचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रसादराव तनपुरे हे ज्युनियर आमदारांप्रमाणे शंकररावजी कोल्हे यांच्या समोर बसले होते. त्यांच्या कामाचे स्वरूप शंकररावजी कोल्हे यांनी जाणून घेतले. मला परत बोलावले सावंत यांना पुन्हा फोन लावायला सांगितला, पण फोन काही लागला नाही. सावंत माझ्याकडे आले आणि म्हणाले अहो तुम्हांला कॉल सेंट्रल एक्साईजचा आहे. तुम्ही राज्य एक्साईजला फोन का लावायला लावता. तुम्ही मेरीटमध्ये आहात गोंधळून जाउ नका. तुमचे काम होईल असे ते म्हणाल्यावर मी बाहेरच्या बाहेर निघुन आलो. पहिल्या तीन मुलांना नोकरीत घेतले आणि माझा चौथा क्रमांक होता. दुर्दैवाने माझे केंद्रीय नोकरीचे काम झाले नाही.
त्यानंतर मी शंकररावजी कोल्हे यांना नोकरीच्या निमीत्तांने भेटलो, त्यांनी कार्यकारी संचालक व्ही पी नायडू यांना भेटायला सांगितले. त्यांनी संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल येथे क्रीडा शिक्षक म्हणून मला नोकरीस घ्यावे असे आदेश केले पण प्राचार्य ताकवले म्हणाले, पाटणकर हे मराठी माध्यमाचे आहेत, आपली शाळा इंग्रजी माध्यमाची आहे. पुन्हा शंकररावजी कोल्हे यांना भेटलो त्यांनी कार्यकारी संचालक व्ही पी नायडू यांना फोन लावला, पाटणकर मराठी माध्यमाचे असू द्या नाही तर उर्दु माध्यमाचे त्यांना नोकरीला घ्या., ही त्यांच्या कामाची पध्दत होती. १९९४ मध्ये मी नोकरीला लागलो. त्यानंतर प्राचार्य ताकवले यांना माझे काम आवडले त्यांनी मला सेकंडरी विभागाचे प्रमुख केले. १९९४ पासून अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या त्यात संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलचे विद्यार्थी नांवलौकीकास पात्र ठरले. सलग १७वर्षे संजीवनीला राज्यस्तरीय क्रमांक मिळत गेला.
शरदचंद्रजी पवार १९९९ ला कोपरगांवी आले त्यांच्या हस्ते संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या राष्ट्रीय पातळीवरील सर्व खेळाडुंचा सत्कार करण्यांत आला. शंकररावजी कोल्हे यांनी शरद पवारांबरोबर माझी ओळख करून दिली, हे आमचे क्रीडा शिक्षक. शरद पवारांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. •
२००९ मध्ये संजीवनी इंजिनियरींग कॉलेजचे घोगरे सर यांच्यानंतर कोपरगांव तालुका क्रीडा संकुलाचे सचिव म्हणून काम करण्याचा अनुभव मिळाला. कोपरगांव तालुका क्रीडा संकुल अद्यावत सोयी सुविधांनी परिपुर्ण करण्याचा निर्णय घेत त्याप्रमाणे शंकररावजी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काम पुर्ण केले. विविध सत्ताधारी आमदारांकडून क्रीडा संकुलाच्या कामासाठी निधी मिळवला. २५० वृक्षांचे येथे रोपण करण्यांत आले. सर्व परिसर नैसर्गीक विविधतेने नटला. कोपरगांव तालुका क्रीडा संकुलातील कामासाठी राज्य शासन तसेच विविध आमदारांचा स्थानिक विकास निधी मिळविण्यासाठी आम्ही शंकररावजी कोल्हे यांच्या सोबत अहमदनगर नाशिक, मुंबई येथे काम केले.,. मंत्रालयाच्या कित्येक पायऱ्या त्यांनी समाज विकासाच्या कामाला लिफ्टचा वापर न करता स्वतः चढल्या आणि उतरल्या, तेव्हा याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. आम्ही थकायचो, पण साहेब कधी थकलेच नाही. निर्णय चूक असो की, बरोबर पण त्याच क्षणाला घेणारे असे हे व्यक्तिमत्त्व होते. गोड बोलून त्यांनी कधीच दुसऱ्याला अंधारात ठेवले नाही, जे काय असेल तो स्पष्टवक्तेपणा होता. त्यांच्या कामाची तळमळ दिसून येत होती.
संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल मधुन सेवानिवृत्त झाल्यानंतर कोणता मनूष्य कुठल्या कामासाठी याची जाणिव शंकरराव कोल्हे यांनाच होती. त्यामुळे त्यांनी ७ वर्षे कोपरगांव तालुका क्रीडासंकुलाचे काम माझेकडे दिले. दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांची गाडी क्रीडा संकुलात येणार म्हणजे येणारच., सर्व मैदानाला चक्कर मारणार कुठे काय कमी आहे, झाडी हिरवीगार आहेत ना, कुठल्या झाडाला पाणी कमी पडले, खेळाचे साहित्य सुस्थितीत आहे का, इमारत व त्याचे संरक्षण ठीक आहे का, नसेल तर त्याच जागेवरून सिव्हिल इंजिनियरला त्याच जागेवरून सूचना देणारेही तेच होते. आज किती मुले मैदानावर आली, त्यांनी कुठले खेळ घेतले इत्यादी बारीक-सारीक माहितींची देवाण घेवाण करून ते उद्याच्या कामाची रूपरेषाही ठरवत आणि त्यानुरूप काम होत होते. शासनाकडून चार कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठी त्यांनी याही वयात जिल्हा क्रीडा अधिकारी अहमदनगर व पुणे येथील क्रीडा संचालक, राज्याचे क्रीडा मंत्री यांना तिने स्मरणपत्रे दिले होते. ते ज्या ज्या वेळी मैदानावर येत त्या त्या वेळी चार कोटी रुपयांच्या निधीच्या पत्राचे काय झाले, अशी विचारणा ते सतत करत असत. माझ्या प्रत्येक सुख दुःखात त्यांनी मला धीर दिला.
२००३ मध्ये त्यांनी व माई सिंधुताईंनी मला विचारले पाटणकर सर तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा, पण मी म्हणालो, साहेब तुमचे प्रेमच माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यांच्या आणि माझ्या विचारात कितीतरी अंतर असले तरी त्यांच्या काम करण्याच्या हातोटीशी मी जूळवुन घेतलं आणि निस्वार्थ भावनेने काम करीत राहिलो., त्यांची पुढची पिढी देखील त्याच तळमळीने सध्या काम करत आहे.
एकदा तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगांव तालुका क्रीडा संकुलात क्रीडा स्पर्धा भरविल्या. त्याचे नियोजनाची बैठक सुरू असतांना एका संचालकांनी मला प्रश्न केला, पाटणकर तुम्ही हया स्पर्धा कशा घेणार त्यावर माजीमंत्री शंकररावजी कोल्हे यांनी मध्येच हस्तक्षेप करत त्या संचालकांना म्हणांले, तुम्ही असे प्रश्न त्यांना विचारू नका, स्पर्धा भरवुन त्या यशस्वी करण्याचा त्यांचा अनुभव मोठा आहे.
क्रीडा क्षेत्रातील काम करणा-या व्यक्तीला शासनांच्या १० टक्के कोटयातून सदनिका मिळत होत्या त्यासाठी मी फाईल तयार केली. तत्कालीन उपमुख्यमंत्री छगनराव भूजबळ यांच्यामार्फत माझ्यासाठी शंकररावजी कोल्हे यांनी खुप प्रयत्न केले, पण शासनाच्या लालफितीचा कारभार त्यात आडवा आला. पण माझ्या सारख्या छोटया कार्यकर्त्याला त्यांनी खुप वेळ दिला, काम होवो अगर न होवो मात्र त्याचा पाठपुरावा ते स्वतः करत असत., अशा कितीतरी आठवणी आमच्या उरात दडलेल्या आहेत., सांगण्यासाठी बराच काळ उलटून जाईल. वारकऱ्यांच्या हृदयातील शंकरराव रुपी पांडुरंग कैलासाच्या प्रवासाला निघून गेला आणि देव्हारा रिता झाला. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील मैदान गाजवलेले असंख्य खेळाडू आज त्यांच्या आठवणीने धाय मोकलून रडत आहेत . राज्यात अनेक क्रीडा संकुलांची जागेअभावी वाट लागली पण कोपरगाव चे क्रीडासंकुल अद्यावत आहे आणि त्याचे सर्व श्रेय शंकरराव कोल्हे यांनाच आहे त्यांनी त्यासाठी कोट्यावधी रुपये किमतीची जमीन अगदी मोफत देऊन टाकली. त्यांच्या कामकाजाची शैली आत्मसात करून आयूष्यात येणा-या प्रत्येक अडचणीवर मात करणे हीच त्यांच्याप्रती खरी श्रध्दांजली ठरेल.
राजेंद्र पाटणकर,
माजी पुणे विद्यापीठ व्हॉलीबॉल खेळाडू,
मार्गदर्शक कोपरगांव तालुका क्रीडा संकुल.
Post Views:
331