आधुनिक शेती चळवळीचा प्रणेता हरपला – मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
The pioneer of modern agricultural movement is lost – Minister Dr. Rajendra Shingane
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Thu 24 Mar 2022 19:00Pm.
कोपरगांव : संघर्षमय स्थित्यंतरातून माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती करत राज्यात आधुनिक शेती चळवळीला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या निधनाने आधुनिक शेती चळवळीचा प्रणेता हरपला असल्याची भावना राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली.
येसगांव येथे कोल्हे कुटूंबियांची गुरुवारी डॉ. शिंगणे यांनी भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आमचे वडील भास्करराव व शंकरराव कोल्हे यांचे विशेष प्रेम होते. विधीमंडळाच्या कामकाजात आपण ज्यूनियर असतानाही कोल्हेंनी आम्हाला सांभाळुन घेत मार्गदर्शन केले. या भागात संजीवनी उद्योग समुहाचे माध्यमातून त्यांनी शेतकऱ्याच्या जीवनांत केलेले कार्य राज्याला लौकीकास्पद आहे. अहमदनगर जिल्हयाबरोबरच त्यांनी राज्याच्या राजकारणाला दिशा दिली. सहकारात वेगळी छाप असलेला माणुस म्हणून शंकरराव कोल्हे यांची वेगळी ओळख होती.
आमच्या भागातील सुत गिरण्या व त्यावर अवलंबून असणारी उद्योग व्यवस्था व पर्यायी अर्थव्यवस्था कशी टिकवायची याचे मार्गदर्शन मला त्यांच्याकडूनच मिळाले. त्यांच्या जाण्याने एका ज्येष्ठ अनुभवी मार्गदर्शकांस आपण मुकलो, त्यांच्या पुढच्या पिढीने विकास व्यवस्थेचा समर्थ वारसा जपला आहे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. याप्रसंगी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार गावित, माजी आमदार राहुल जगताप, भामाठाण येथील अरुणनाथागरी महाराज, हभप कैलास महाराज दुशिंग, लखन महाराज, धर्मनाथ महाराज, बद्री थोरात महाराज, पुणे येथील माहिती तंत्रज्ञान उद्योजक अविनाश भामरे, राहुल चेचरे महाराज आदिंनी कोल्हे शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा देत कोल्हे कुटुंबीयांचे सांत्वन केले.