दारणेच्या पाण्यावर डल्ला; आ.आशुतोष काळे गप्प का ? – मच्छिंद्र टेके

दारणेच्या पाण्यावर डल्ला; आ.आशुतोष काळे गप्प का ? – मच्छिंद्र टेके

Lean on the water of the darana ; Is Ashutosh Kale silent? – Machhindra Teke

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Mon 16 May 2022, 16.40
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव : सन २००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा होत असतांना तत्कालीन आमदार अशोक काळे यांनी संमती दिली, आता दारणा धरणांतुन येवला तालुक्यातील ४० गावांना पिण्यांचे पाणी मंजुर झाले असतांना त्यांचेच सुपुत्र व विद्यमान आमदार तालुक्याच्या शेती व पिण्याच्या पाणीप्रश्नी गप्प का, याप्रश्नी आमदार आशुतोष काळे यांनी जाहिर विरोध का नोंदविला नाही असा सवाल पाणी प्रश्नाचे गाढे अभ्यासक, माजी सभापती मच्छिंद्र टेके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलतांना केला. दारणेवर बिगर सिंचन पाण्यांचे आरक्षण वाढत असल्याने भविष्यात शेतीसाठी पाणीच मिळणार नाही असेही ते म्हणाले.

 सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेत मच्छिंद्र टेके बोलत होते. व्यासपिठावर उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक शिवाजीराव वक्ते, प्रदिप नवले, मच्छिंद्र लोणारी, बाळासाहेब वक्ते, कैलास माळी, माजी सभापती मच्छिंद्र केकाण, सुनिल देवकर, केशव भवर, भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, राजेंद्र पानगव्हाणे, संभाजीराव गावंड, दिलीप बनकर आदि उपस्थित होते.         

   मच्छिंद्र टेके पुढे म्हणाले की, माजीमंत्री कै. शंकरराव कोल्हे यांनी पालखेड धरणाचा पाठपुरावा करून येवला, निफाड, लासलगांव बरोबरच कोपरगांवच्या पुर्व भागासाठी पाणी आणले मात्र पालखेड मधून सध्या तालुक्याला एक थेंबही पाणी मिळत नाही. येवला तालुक्यासाठी मात्र दारणा धरणांतुन पाणी का घेतले याबाबत विद्यमान लोकप्रतिनिधींनी लक्ष घालुन हा प्रश्न सोडविण्या ऐवजी ते गुंता वाढविण्यांस तर मदत करत नाही ना ? अशी शंका निर्माण होते. निळवंडे कालवा व पिण्याच्या पाण्यांच्या प्रश्नांवर विद्यमान आमदारांनी दुटप्पी भूमिका घेवुन पोहेगांवच्या वरच्या भागातील गावांत एक आणि शहरात आल्यावर वेगळी भूमिका घेत राजकारण केले., झारीतले शुक्राचार्य बनवून निळवंडे शिर्डी कोपरगाव पिण्याच्या पाणी योजनेला न्यायालयाच्या माध्यमातून खोडा घातला. कोपरगांव मतदार संघाचा पाण्यांचा प्रश्न आता आणखीनच जटील बनत चालला आहे येथील शेती व उद्योगधंद्याची वाट लागली असतांना भविष्य धुसर आहे असेही ते म्हणाले. 

केशव भवर याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, पालखेड मधुन पाणी मिळत असतांना येवल्याच्या लोकप्रतिनिधींनी भविष्याचा विचार करून दारणेवर आरक्षण टाकले त्यावर विद्यमान लोकप्रतिनिधी एकही शब्द बोलायला तयार नाही. आधी समन्यायी वाटप कायदा आता येवला तालुक्यातील ४० गावांना पाणी ही काळे कुटूंबियांची मुकसंमतीची पुनरावृत्ती आहे. गोदावरी कालव्यांसाठी ५०० कोटी आणणार असल्याच्या वल्गना करणा-या आमदार काळे यांनी अडीच वर्षात किती कोटी आणले ते अगोदर सांगावे. कोपरगावचे पाणी पळविले जात असतांना त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. काकडी विमानतळासाठी १५० कोटींची तरतूद केली हे जाहिर वक्तव्य करणा-या आमदारांनी पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्यांच्या कामाला किती रूपयांची तरतुद केली का असा जाहिर सवाल भवर यांनी केला.         

याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, संचालक मच्छिंद्र लोणारी, कैलास माळी, माजी सभापती सुनिल देवकर यांनीही कोपरगांवच्या शेती व पिण्यांच्या पाण्यांच्या पाण्याचा प्रश्न पोटतिडकीने मांडुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पुढील ठोस भूमिका घेवुन पाण्यांचा लढा अधिक तीव्र करू असे सांगितले. 

चौकट       

  भविष्याचा वेध घेत कै. शंकरराव कोल्हे यांनी मुकणे धरण व उंची वाढीसाठी वेळप्रसंगी आपल्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केला मात्र सध्याचे लोकप्रतिनिधी पाण्यासाठी जनतेबरोबर की सरकारसोबत आहे ही भूमिका त्यांनी अगोदर जाहिर करावी असे भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम म्हणाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page