टाळेबंदी नव्हे इष्टापत्ती ; मनातील ऊस शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले
तंत्रज्ञानातुन साधली जादा उसाचे उत्पादनाची किमया
वृत्तवेध ऑनलाइन । 18 July 2020
By: Rajendra Salkar (Magova)
कोपरगाव : शेती हा व्यवसाय असला तरी शेतीमध्ये परवडत नाही. असेच अनेक शेतकऱ्यांचे मत असते. शेती ही आनंदाने व नवनवीन प्रयोग केल्यावर तिच्यात निघणाऱ्या उत्पादनात वाढ होते. स्वप्नाला कुतूहल कष्टाची जोड देऊन ही किमया करून दाखविली,
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील एका शेतकरी तरुणाने त्याचा घेतलेला हा मागोवा !
लोकडाऊन च्या काळात हातावर हात घालून बसण्यापेक्षा आपण शेती मध्ये नवीन काही तंत्रज्ञान चा उपयोग करून उसाचे उत्पादन घेऊन जास्त प्रमाणात उत्पादन कसे घेता येईल ? असा विचार सारखा संवत्सर येथील बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या शेतकरी संदीप बारहाते या तरुणाच्या मनात घोळत होता. या मनातील विचाराला मूर्त स्वरूप देण्यासाठी जिज्ञासा व कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्याने सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना येथील ऊस विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला तसेच कोणत्या शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त प्रमाणात उत्पादन घेतले आहे. त्यांची माहिती मिळवली यांच्या शेतावर जाऊन ऊस लागवड कशी व कधी केली यावर अभ्यास केला. तसेच युट्युबर ऊस तज्ञ डॉ. संजीव माने यांनी सांगितलेले मार्गदर्शन आत्मसात केले.
सर्व गोष्टी लक्षात घेऊन संदीप बारहाते यांनी पुण्याहून 86032 रोपं आणून आपल्या दीड एकर शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड केली.
कोणत्याही संकटांच्या प्रसंगांत खंबीरपणे पाय रोवून उभे राहणे हा माणसांचा मूळ स्वभाव आहे. या स्वभावातूनच, मागील चार महिन्यांच्या कठीण अशा टाळेबंदीच्या काळात जगण्याचे नवनवे पर्याय शोधले जात आहेत. तालुक्यातील संवत्सर येथील युवकांने हाती घेतलेला हा उपक्रम याचेच एक उत्तम उदाहरण बनले आहे. सातत्याने नवनवीन प्रयोग करून आज सातच महिन्यांचा कालावधी मध्ये त्यांनी केलेल्या उसाची वाढ पाहता किमान एकरी शंभर टनांच्या पुढे उत्पादन मिळू शकेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जमिनीचा कस, पाण्याचे बिघडलेले वेळापत्रक, उसाचे घटलेले उत्पादन अशा परिस्थितीत संदीप बारहाते यांचा हा ऊसाचा दीड एकराचा प्लॉट पाहण्यासाठी पंचक्रोशीतील व विविध ठिकाणचे ऊस उत्पादक शेतकरी भेटी देऊन संदीप बारहाते याच्यांकडून माहिती घेत आहेत.
शुक्रवारी (१७ जुलै) रोजी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी व शेतकरी यांनी भेट दिली व पाहणी करून संदीप बारहाते यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. यावेळी ऊस विकास अधिकारी देवकर, प्रवीण लहारे, वालझाडे व स्लिप बॉय भारुड तसेच प्रगतशील शेतकरी प्रताप बारहाते, बापू बारहाते, पोस्ट मास्तर दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी दूरध्वनीवरून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी देखील बारहाते यांचे अभिनंदन केले.