निष्क्रियता झाकण्यासाठी पाच नंबर तलावाच्या कामाबाबत राष्ट्रवादीकडून खोटा प्रचार- दत्ता काले
False propaganda by NCP regarding five number pond work to cover up inaction- Dutta Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 30July, 19.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहराचा पाणी प्रश्न आ. आशुतोष काळे यांच्या निष्क्रितेमुळे भिजत पडला आहे. नगरपालिकेच्या पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरू झाल्याच्या खोट्या बातम्या पेरून निष्क्रियता झाकण्यासाठीच शहरातील जनतेला वेड्यात काढण्याचा खटाटोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून सुरू असल्याचा घणाघाती आरोप भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
प्रत्यक्षात साठवण तलावाचे काम सुरू झालेले नसतानाही नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून श्रेय लाटण्याच्या अट्टहासापोटी शहरवासियांना भविष्यात मुबलक पाणी मिळणार आहे, असे आ. आशुतोष काळे आणि त्यांचे समर्थक खोटे सांगत आहेत. गाजर दाखवून २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली, पण गेल्या तीन वर्षांत शहराचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. असे काले यांनी पत्रकात म्हटले आहे.
दररोज शुद्ध व पुरेसे पाणी देण्याचे दायित्व असताना कालवे सुटले की चार दिवसाआड पाणी करून जनतेला दिलासा देता येणार नाही. पाच नंबर साठवण तलावाला आमचा विरोध नाही भाजप शिवसेना रिपाई युतीच्या आमच्याच नगरसेवकांनी याला पूर्ण बहुमताने पाठिंबा दिला आहे. परंतु पाच नंबर तलाव झाल्यानंतर शहरातील नागरिकांना दररोज शुद्ध व पुरेसे पाणी मिळणार मिळणार आहे का ? या प्रश्नाचे उत्तर द्या. पाच नंबर तलावाचा प्रश्न पालिका प्रशासन नगरसेवक समाजसेवक या सर्वांच्या पाठपुरावा व प्रयत्नातून झालेला असताना मीच आणले म्हणून श्रेय कसे घेता ? सवाल काले यांनी पत्रकातून केला आहे.
१३१ कोटी रुपये निधीसाठी १९ कोटी लोक वर्गणी भरण्याची नगरपालिकेची आर्थिक कुवत आहे का पाणी भरण्यासाठी चार ते पाच आवर्तने वाढणार आहेत का तात्कालीन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पाच नंबर साठवण तलाव झाल्यानंतर सुद्धा शहराला दररोज पाणी देता येणार नाही असे स्पष्ट सांगितले होते यावर आपण काय म्हणणार ? हरित लवादाने गोदावरी नदीचे पाणी प्रदूषित असून, पिण्यासाठी योग्य नाही, असे शासनाच्या निदर्शनास आणून दिलेले असताना देखील शहरवासियांना दूषित पाणी पाजण्याचा अट्टहास कशासाठी? असे अनेक प्रश्न काले यांनी पत्रकातून उपस्थित केले आहे.
निळवंडे-शिर्डी-कोपरगाव ही बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची योजना अत्यंत फायदेशीर आहे, परंतु राजकीय कृपाशीर्वादाने साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद मिळालेल्या आ. आशुतोष काळे यांनी या योजनेच्या पूर्णत्वासाठी अद्यापपर्यंत चकार शब्दही काढला नाही किंवा कार्यवाही केली नाही. कारण त्यांना या योजनेत अडथळे आणून शहरवासियांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवायचे आहे , असा आरोपही काले यांनी केला आहे.
चौकट
कोपरगाव शहरासह तालुक्याचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी कोल्हे परिवाराचे योगदान हे जनतेला चांगलेच माहीत आहे. मात्र काळे परिवाराने पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आजपर्यंत कोणतेही योगदान दिलेले नाही. उलट समन्यायी पाणीवाटप कायदा असो की दारणा धरणातून येवला तालुक्यातील ४० गावांना पाणी देण्याचे प्रश्नावर काळे पिता पुत्रांनी मौनच पाळले आहे त्यामुळेच कोपरगाव तालुक्याला हक्काचे पाणी गमवावे लागले, – दत्ता काले शहराध्यक्ष भाजप.





