कोपरगाव :चाकूचा धाक दाखवत शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा, ७ दरोडेखोरांनी पावणे तीन लाखांचा ऐवज केला लंपास
Kopargaon: Robbery at the house of farmers showing fear of knife, 7 robbers exchanged 3 lakhs for money.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 14 Sep, 18.30 pm
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील शहर पोलीस स्टेशन हद्दीतील नऊचारी संवत्सर येथील शेतकऱ्यांच्या वस्तीवर गुरुवारी (दि. १५) मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या घरात सात दरोडेखोरांनी दरोडा टाकला यावेळी लाकडी दांडका व लोखंडी गजाने मारहाण करून घरातील व्यक्तींना जखमी करून दरोडेखोरांनी नऊ तोळे सोन्यासह सात हजार रुपयांची रोकड व साडेसात हजाराचे तीन मोबाईल असा पावणेतीन लाखाचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
तालुक्यातील नऊचारी संवत्सर अनिल हरिभाऊ सोनवणे (५४) यांचे घर आहे. रात्री घरात सर्व जण झोपले असताना अज्ञात सात जणांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील अनिल हरिभाऊ सोनवणे (५४) सुनीता बबन सोनवणे (५२) सुगंधाबाई हरिभाऊ सोनवणे (७८) यांना लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले व चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी सोने, व सात हजार रुपयांची रोख असा सुमारे दोन लाख ८१ हजाराचा (बाजार मूल्यानुसार) ऐवज लंपास केला. या दरोड्यातील तीनही जखमेवर कोपरगाव ग्रामीण रुग्णालय व साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे उपचार सुरू आहेत
घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली.
याप्रकरणी सौ कविता अनिल सोनवणे (५०) यांनी कोपरगाव शहर पोलिसात दुपारी दरोड्याची फिर्याद दाखल केली आहे सदर फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनमध्ये 287 / 2022 भादवी 395 397 अन्वये अज्ञात सात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.
यानंतर सकाळी सहा वाजता पोलिस अधीक्षक मनोज पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळांना भेट दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलिसांच्या पथकांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
Post Views:
253