उभ्या शेतातील पन्नास हजाराच्या पाच क्विंटल पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला 

उभ्या शेतातील पन्नास हजाराच्या पाच क्विंटल पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला 

Five quintals of white gold worth 50,000 are stolen by thieves

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 9 Nov , 18.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :कपाशीच्या भावात मोठी वाढ झाल्याने  तालुक्यात  कपाशी चोरीच्या घटना वाढल्या आहेत.  कोपरगाव  तालुक्यातील डाऊच बुद्रुक येथील दोन शेतकऱ्याच्या शेतातून चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुमारे ४ ते ५ क्विंटल कापूस वेचून नेल्याची घटना घडली आहे.

डाऊच बुद्रुक परिसरातील सर्वे नंबर १०३ मधील भिवराव मार्तंड दहे व गणपत संपत दहे या दोन शेतकऱ्यांच्या शेतातील  कपाशीच्या बोंडा मधून निघालेला कापूस पौर्णिमेच्या   रात्री चंद्र प्रकाशात  वेचणी करून ४०  ते ५० हजार रुपये किमतीचा चार ते पाच क्विंटल कापूस चोरून नेल्याचे समोर आले आहे. 
शेतातील कापूस गावाजवळील चोरट्यांनी चोरल्याचा संशय व्यक्त केला आहे. कापसाच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट झाली असुन, शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला आहे. अशातच मोठ्या कष्टाने लावलेल्या कपाशीवर भुरट्या चोरांकडून डल्ला मारला जात आहे. मोठ्या प्रमाणात कापूस चोरून तो खेडाखरेदी धारकांना विकत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहेत.
 आज कपाशीला जवळपास नऊ ते दहा हजार रुपये क्विंटल इतका भाव आहे. रात्री दोन तीन तासांमध्ये साधारण एक माणूस ३० ते ४० किलो कापूस गोळा करु शकतो मात्र ही चोरी करताना साधारण दहा ते पंधरा चोर असल्याचे सांगण्यात येते. एकाच रात्रीत हे चोरटे साधारण तीन ते चार क्विंटल पर्यंत कापूस चोरून नेतात. यामुळे शेतकऱ्यांचे रातोरात तीस ते चाळीस हजार रुपयांचे नुकसान होत आहे. कापसाबरोबरच या परिसरातून सोंगलेल्या सोयाबीनचे कडपे देखील चोरीला गेले असल्याच्या घटना घडल्या आहेत. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून शेतकऱ्यांनी आता शेतात रात्री गस्त घालण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतातील विक्रीसाठी आलेला माल चोरीला जात असल्याच्या घटना जवळपास या परिसरात चार ते पाच वर्षापासून घडत आहे. हे संबंधित चोरी करणारे चोर देखील शेतकऱ्यांना माहित आहे मात्र त्यांच्या दहशतीपुढे शेतकरी हतबल झाले आहेत. तेव्हा पोलीस स्टेशनने या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page