लंम्पी रोगासाठी हेस्टर कंपनीच्या लसीचे महाराष्ट्रात सर्वाधिक योगदान – राजीव गांधी
Hester Company’s Vaccine for Lumpy Disease Highest Contribution in Maharashtra – Rajiv Gandhi
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 9 Dec22 , 18.50 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगांव : जनावरांमध्ये पसरलेला लम्पी स्कीन डिसीज ( चर्मरोग) रोखण्यासाठी हेस्टर बायोसायन्सेस कंपनीने निर्मिती केलेली लस महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेली असून राज्याबाहेरही या लसींचा शेतकऱ्यांनी आपले पशुधन वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला असल्याची माहिती हेस्टर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव गांधी यांनी दिली.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यस्थळावर दूध उत्पादकांसाठी ” जनावरांच्या समस्या व त्यावरील उपाय ” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना श्री गांधी बोलत होते. नाशिक पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे, अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, हेस्टर बायोसायन्सेस कंपनीचे सहयोगी संचालक राज रुघवाणी, विभागीय विक्री व्यवस्थापक अमित हरिश्चंद्रे, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक राजेंद्र रोकडे, कोपरगांव येथील पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गोदावरी दूध संघ परिवार व दूध उत्पादकांच्यावतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
हेस्टर बायोसायन्सेस ही देशातील पोल्ट्री व गोट फॉक्स व्हॅक्सीन (लस) निर्माण करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान, चंदीगड, छत्तीसगड आदी राज्यात मोठी बाजारपेठ कंपनीने तयार केली आहे. जनावरांच्या आजारावरील लसींचा तुटवडा लक्षात घेऊन हेस्टर कंपनीने लस निर्मितीचे युनीट सुरु केले. अलिकडच्या दोन वर्षात लंपी स्क्रीन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर महाराष्ट्राने हेस्टर कंपनीकडून सर्वात जास्त लस खरेदी करुन या रोगावर नियंत्रण मिळविले. यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रामुख्याने पुढाकार घेऊन गावोगांवी वाड्यावस्त्यांवर मोफत लस उपलब्ध करून दिली. आज लम्पी चर्मरोग ९० टक्क्याहून अधिक प्रमाणावर ओटोक्यात आलेला असून याचे श्रेय ना. विखे पाटील यांनाच द्यावे लागेल असे सांगून श्री गांधी यांनी हेस्टर बायोसायन्सेस कंपनीने १९९७ मध्ये पशुवैद्यकीय व्यवसाय सुरु केल्यानंतर आज प्राण्यांच्या आरोग्याच्या क्षेत्रातील सर्वात वैविध्यपूर्ण कंपनी म्हणून नांवलौकीक प्राप्त केलेला आहे. उत्पादन श्रेणी, गुणवत्तापूर्वक सेवा आणि लसीकरणामध्ये हेस्टर कंपनी आज अग्रक्रमांकावर आहे. संस्थेचे संस्थात्मकीकरण करणे, उच्च नैतिक मूल्यांचे जतन करणे आणि समाज व मानवासाठी योगदान देणे हे हेस्टर कंपनीचे भविष्यातील दीर्घकालीन उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले.
नाशिक पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह. आयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे यांनी आपल्या भाषणातून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील लम्पी चर्मरोगाबाबतची माहिती दिली. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये १४४. १२ लक्ष लसी उपलब्ध करुन देण्यात आल्या असून त्यामधून अहमदनगर, जळगांव, औरंगाबाद, धुळे, अकोला, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वासिम, जालना, नंदुरबार, मुंबई उपनगर या जिल्ह्यामधील सुमारे १३९.४२ लाख जनावरांना मोफत लसीकरण करण्यात आलेले आहे. खाजगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तीक पशुपालकांनी करुन घेतलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात शंभर टक्के लसीकरण झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. अर्थात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राने आघाडी घेतलेली असल्याचेही डॉ. नरवाडे यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी गोदावरी दूध संघाचे संचालक, दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्थांचे प्रतिनिधी, बायफ संस्थेचे अधिकारी, पशु चिकित्सक उपस्थित होते. अनेकांनी आपल्या समस्या मांडून शंकांचे निरसन करुन घेतले. सूत्रसंचालन कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी केले.
Post Views:
161