वारीच्या श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर – आ.आशुतोष काळे
Shri Kshetra Rameshwar Devasthanam of Wari approved ‘C’ class status – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat24 Dec22 , 16.20 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :आ. आशुतोष काळे यांनी मागील तीन वर्षात श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती देवस्थान पोहेगाव, श्री. लक्ष्मीमाता मंदिर देवस्थान कोकमठाण, श्री जगदंबा माता मंदिर देवस्थान ब्राम्हणगाव या तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग दर्जा मिळविला आहे. यामध्ये कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तालुक्याच्या पूर्व भागातील वारी व परिसराचे श्रद्धास्थान असलेल्या वारी येथील श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानाचा देखील समावेश करण्यात आला असून श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी व पंचक्रोशीतील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळावा व या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा अशी भाविकांची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळावा यासाठी शासनदरबारी प्रस्ताव दाखल करून त्याबाबत त्यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. शनिवार (दि.२४) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासकामांना जिल्हा नियोजन मधून जास्तीत जास्त निधी मिळावा अशी मागणी केली त्या मागणीला पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, खा. सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखे, आ. संग्राम जगताप, आ. किरण लहामटे, आ.लहू कानडे, आ. राम शिंदे, आ. मोनिकाताई राजळे, जिल्हा नियोजन अधिकारी भदाणे आदी उपस्थित होते.
दक्षिणवाहिनी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर ऐतिहासिक व पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या नवसाला पावणारे देवस्थान अशी ख्याती असणारे श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान या ठिकाणी भगवान रामेश्वराचे पौराणिक महत्व असलेले शिव मंदिर आहे. या ठिकाणी वर्षभर शिवभक्त येत असतात विशेषत: श्रावण महिना व महाशिवरात्रीच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी असते तसेच हरतालिका पूजनासाठी दरवर्षी महिलांची मोठी गर्दी होते. या श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती मिळणार असून भाविकांसाठी चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा निर्माण होणार आहे. त्यामुळे वारी ग्रामस्थ व वारीसह पंचक्रोशीतील भाविकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.