कोपरगाव कारागृहातील ३५ खतरनाक कैदी यांची हरसुल कारागृहात रवानगी
35 dangerous prisoners from Kopargaon Jail were sent to Harsul Jail
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 2Feb23 , 15.40 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगांव :- येथील दुय्यम कारागृहातील गंभीर गुन्हयांतील ३५ आरोपींना मध्यवर्ती कारागृहात हरसुल औरंगाबाद येथे मोठया पोलीस बंदोबस्तात आज पाठविण्यांत आले.
यामध्ये शिर्डी मधील सूरज ठाकरे यांचेवर केलेल्या गोळीबारातील आरोपी किरण हजारे, रविंद्र गोंदकर, तनवीर रंगरेज, आकाश लोखंडे आदि आरोपींचा समावेश आहे. तसेच शिर्डीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिंगटोन प्रकरणांमधील सागर शेजवळ खून प्रकरणांतील सोमनाथ वाडेकर, रामा जाधव, दिपक मांजरे, शोयब शेख, किरण आजबे, विशाल कोते आदि आरोपींचा समावेश आहे.
लोणी पोलीस स्टेशनचा खतरनाक आरोपी शाहरुख सत्तार खान तसेच उर्वरित सर्व भादविक ३०२,३०७,३९५,३७६ , या कलमातील एकूण सहा पोलीस स्टेशनच्या कोपरगांव शहर पोलीस स्टेशन, कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन, शिर्डी पोलीस स्टेशन, राहाता पोलीस स्टेशन, लोणी पोलीस स्टेशन व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथील गुन्हयांतील आरोपींचा समावेश आहे.
कारागृहाचे तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी सदरचा प्रस्ताव दि. ७ जानेवारी २०२३ रोजी कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग येरवडा पुणे यांना पाठविला होता. सदरील प्रस्तावामध्ये कोपरगांव दुय्यम कारागृहात एकूण पाच कोठड्या असून, त्यामध्ये आरोपी ठेवण्याची क्षमता ही केवळ २५ अशी आहे परंतु सध्या ९० चे वर आरोपी संख्या झाल्याने तसेच सदरचे कारागृह हे अत्यंत जुने झालेले असल्याने गंभीर गुन्हयांतील आरोपींना वर्ग करण्यांस परवानगीची मागणी केलेली होती.
त्यांस कारागृह उपमहानिरीक्षक येरवडा पुणे यांनी दि.२४ जानेवारी रोजी ३५ आरोपींना वर्ग करण्याचा आदेश तुरुंगाधिकारी दुय्यम कारागृह यांना दिला.तदनंतर कारागृह प्रशासनाने ३५ गंभीर गुन्हयांतील आरोपींना घेऊन जाण्यासाठी स्ट्रॉंग पोलीस बंदोबस्त व मोठया वाहनांची मागणी पोलीस अधिक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी यांचेकडेस दि.२४ जानेवारी रोजी नोंदविली, मात्र नाशिक पदवीधर निवडणूक असल्याने पोलीस बंदोबस्त दि. गुरुवारी २ फेब्रुवारी रोजी प्राप्त झालेने ३५ आरोपींना सुरक्षिततेचे कारणास्तव मोठया पोलीस बंदोबस्तात पाठविण्यांत आले.
यावेळी कोपरगांव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत दाते व रोहिदास ठोंबरे तसेच एकूण सहा पोलीस ठाण्याचे २४ पोलीस अंमलदार व वरिष्ठ दर्जाचे दोन उपनिरीक्षक असा मोठा फौजफाटा संजय सातव एस.डी.पी.ओ. शिर्डी भाग यांनी कारागृह प्रशासनास पुरविला.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक, डॉ. कृष्णा फुलसौंदर व वैद्यकीय पथक यांनी आरोपींची वैद्यकिय तपासणी करुन दिली. याबाबत कारागृह प्रशासनाने तहसिलदार विजय बोरुडे व तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी पोलीस अधिक्षक राकेश ओला अहमदनगर, शिर्डी विभागाचे संजय सातव कोपरगांव पोलीस स्टेशन व इतर सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांचे आभार मानले.
Post Views:
451