कृषिपंपांच्या खंडीत विजेबाबत राज्य सरकारला सौ. स्नेहलता कोल्हे यांचे निवेदन
Mrs. to the state government regarding the intermittent electricity of agricultural pumps. Statement by Snehalata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 9 Feb23 , 16.30 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा वीजबिले थकल्याच्या कारणाखाली महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यात येत आहेत. त्याबाबत भाजप प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सध्या शेतात रब्बी, उन्हाळी पिके, बारमाही बागायती पिके उभी आहेत. शेतकरी आधीच अनियमित आणि कमी दाबाने होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत.त्यात आता उन्हाच्या झळा वाढल्यामुळे पिकांना पाण्याची मागणी वाढत आहे. रब्बी पिकांना शेवटचे पाणी देण्याची वेळ आली असताना महावितरणकडून सध्या वीजबिले थकल्याच्या कारणाखाली शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके धोक्यात आली असून,अशाप्रकारे कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करणे बेकायदेशीर आहे.
पावसाळ्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीने झोडपल्यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. या संकटातून सावरण्यासाठी शेतकरीवर्ग प्रयत्न करत आहे. शेतकर्यांच्या अडचणी लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये आणि त्यांना सुरळीत वीजपुरवठा करावा.त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.





