स्व. शंकरराव कोल्हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व !

स्व. शंकरराव कोल्हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व !

 Shankarao Kolhe a multifaceted personality!

उत्कृष्ट चिंतक आणि प्रभावी वक्ते
धाडसी राजकारणी, भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी,ग्रामीण शिक्षणातून परिवर्तनावर विश्‍वास

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat4 March23 ,16.00 Pm By राजेंद्र सालकर

राजकारणात एका गुणाची फार गरज असते. तो गुण आहे जोखीम पत्करण्याचा.आयुष्यात वादळे घोंगावत नसतील तर प्रवास रोचक होत नाही. काही मोठे साध्य करता येत नाही. जोखीम पत्करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांमध्ये शंकरराव कोल्हे यांचे नाव फार महत्त्वाचे आहे. नेहमीच त्यांनी जोखीम पत्करण्याची तयारी ठेवली. राजकारणातील दुसरी महत्त्व बाब असते भूमिकेवर ठाम राहण्याची. अनेकदा भूमिका घेताना राजकीय सोय आधी पाहिली जाते. पण, राजकीय परिणामांची पर्वा न करता भूमिका घेण्याचे धारिष्ट्य कोल्हे साहेब कायम दाखवित आले. एखाद्या भूमिकेचे राजकीय परिणाम काहीही झाले तरी त्यावर ते कायम राहत. त्यामुळेच सामान्य कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा आधार वाटायचा.


सुमारे ६० ते ७० वर्षे कोपरगावातील
कार्यकर्त्यांसाठी एक हक्काचा नेता असा त्यांचा त्या कालखंडातील प्रवास होता. नगर जिल्हाने राज्याच्या राजकारणाला तसे अनेक नेते दिले. शंकरराव कोल्हे त्यातीलच. एका सक्षम, परिपक्व आणि धाडसी नेत्याच्या अंगी लागतात, ते सारे गुण त्यांच्या ठायी होते . एवढ्या मोठ्या नेत्याला विरोधकांशी कमी आणि स्वपक्षीयांशीच अधिक संघर्ष करावा लागला, हे मत मात्र नोंदवायलाच हवे.
कोपरगावच्या शेती असो किंवा पिण्याच्या पाण्यासाठी चळवळ जेंव्हा-जेंव्हा आंदोलनात्मक पवित्रा घ्यायची वेळ येई, तेंव्हा त्यात अर्थातच शंकरराव कोल्हे यांचे नाव प्राधान्याने असायचे. केवळ त्या अर्थाने ते तालुक्याचा बुलंद आवाज होते, असे नाही तर कोपरगाव मतदार संघाचे प्रश्न, समस्या विधानसभेत मांडण्याचे धाडस दाखविण्याचे कामसुद्धा ते मोठ्या खुबीने करायचे. मला अजूनही आठवते, कोपरगावच्या पाणी प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या विरोधात, पवित्रा त्यांनी घेतला होता.
कोपरगांव तालुक्याच्या पाटपाण्यांच्या प्रश्नावर त्यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आग्रही भूमिका घेत राज्याच्या नेतृत्वापर्यंत त्याची धग पोहोचवली होती. पद्मसिंह पाटील हे पाटबंधारे मंत्री असतांना शंकरराव कोल्हे यांनी मंत्रालय मुंबई येथे शेतक-यांचे शिष्टमंडळ नेले होते. मात्र पद्मसिंह पाटील हे त्यांना सतत पुढची तारीख द्यायचे तेव्हा त्यांनी पदमसिंह पाटलांना ठणकावून सांगितले, आम्ही काय आरोपी आहोत काय? दरवेळेस तुम्ही आमच्या मागण्यांचा विचार विनीमय न करता पुढची तारीख देता, हे बरोबर नाही. उर्ध्व गोदावरी खो-यातील पाटपाण्याचा प्रश्न ज्वलंत झाला आहे. तुटीच्या खो-यात पाणी आणल्याशिवाय नगर नाशिक विरूद मराठवाडयाचा पाणीप्रश्न सुटणार नाही तेंव्हा मंत्री म्हणून तुम्ही ठोस भूमिका घ्या आणि काय तो आमच्या पाणी प्रश्नाचा साक्षमोक्ष करा.
निवडणुकीत टोकाची भूमिका न घेता त्यांनी कायम जिंकण्यासाठी भूमिका घेतली. स्वर्गीय शंकरराव काळे व स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे एकमेकांचे पक्ष, भूमिका, ध्येयधोरणे वेगळी असली तरी त्यांच्यात मनभेद कधीही नव्हते. कालांतराने वेगवेगळी मंत्रीपदाची संधी त्यांना मिळाली, तेंव्हा कोपरगावच्या विकासासाठी अतिशय तळमळीने प्रश्न मांडणे आणि त्याचा पाठपुरावा करीत ते सोडवून घेणे, हे त्यांनी कधीही सोडल नाही. ते त्यांच्या रक्तातही नव्हते. कायम लढाऊ बाणा, हीच जणू त्यांची ओळख! अजून एक आठवण म्हणजे, ते परिवहन मंत्री असताना जिल्ह्यातील व मतदारसंघातील अनेकांना त्यांनी परिवहन खात्यात नोकरीची संधी दिली.
अनेक वर्षे सत्तेत राहिल्याने त्या काळात मतदार संघातील बाजू मांडताना नेत्यांपुढे लोंटागण घालण्याचेच बहुतेकांचे धोरण असायचे. शंकरराव कोल्हे यांचे तसे नव्हते. ते मुंबईत जाऊन वेगळी भूमिका आणि मतदार संघात येऊन वेगळी भूमिका असे कधीच करीत नसत. नांदुरमध्यमेश्वर जलद कालव्याच्या प्रश्नावर बिपीनदादा कोल्हे दोन हजार शेतक-यांचा ताफा घेऊन थेट धरणावर गेट बंद आंदोलनासाठी जाऊन बसले. नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणीप्रश्नाची धार तीव्र बनली. त्यात तत्कालीन सेनेचे आमदार स्व. आर. एम. वाणी यांनी पाणी दिले नाही तर बंदुकीची गोळी घालून रक्ताचे पाट वाहू असा इशारा दिला तर तिकडे शंकरराव कोल्हे यांनी खडा सत्याग्रह आंदोलनाचे हत्यार उपसले,पद्मसिंह पाटील पाटबंधारे मंत्री असल्याने ते दोन्हीकडून अडचणीत सापडले. २००३ मध्ये नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याची पाण्याची चाचणी होती. कोपरगांवकरांच्या पाण्याची अगोदर सोय लावा अन खुशाल पाणी घेऊन जा असे शंकरराव कोल्हे यांनी सुनावले. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागली.शंकरराव कोल्हे यांनी मुकणे धरण गेट कुलुपाची चावी स्वत:कडे ठेवली होती त्यामुळे आणखीनच पेच वाढला. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे सर्व पाटबंधारे विभागाचे शासकीय अधिकारी जलद कालव्याच्या पाणी चाचणीसाठी दाखल झाले, मंत्री पाटील कुलुपाची चावी मागायचे अन् शंकरराव कोल्हे म्हणायचे चावी माझेकडे नाही, मुलगा बिपीनकडे आहे. मंत्री पाटील बिपीनदादाकडे चावी मागायचे त्यावर ते म्हणायचे चावी कोल्हे साहेबांकडेच आहे. अगोदर आम्हा सर्व शेतक-यांच्या गोदावरी कालव्याच्या पिण्याच्या व शेतीच्या पाणी प्रश्नाची कड लावा, जलद कालव्याच्या वितरीका एक व दोनची कामे सुरू करा, १० टक्के जलद कालव्यातून उपसा सिंचनाचे परवाने द्या, उर्ध्व गोदावरी खो-यातील प्रलंबीत धरणांची व निळवंडे धरणासह कालव्याची कामे मार्गी लावा, जलद कालव्यासाठी जमिनी देणा-या शेतक-यांच्या मुलांना सरकारी नोकरीत सामावुन घ्या, अशा एक ना अनेक प्रश्नांची यादी कोल्हेसाहेब यांनी वाचली, साडेचार तास हा गोंधळ सुरू होता, शेवटी शरद पवारांनी मध्यस्थी करत या प्रश्नांवर तोडगा काढला तेंव्हा कुठे शंकरराव कोल्हे यांनी मुकणे व नांदुरमध्यमेश्वर बंधा-याची चावी दिली आणि मंत्री पाटील यांनी मराठवाड्याला पाणी दिले. प्रसंगी शीर्षस्थ नेतृत्त्वालाही ठणकावून सांगणाऱ्या फार थोडक्या नेत्यांमध्ये कोल्हे साहेब यांचे नाव अग्रभागी असायचे. हिंमत त्यांनी सदैव दाखवली.

सन २००० मध्ये शंकरराव कोल्हेंनी इंटरनॅशनल फोरम फॉर इंडीयन अॅग्रीकल्चर संस्था कोपरगावात स्थापन करून भारतीय शेतक-यांचे शेतीचे आणि व्यापार करारात हक्क अबाधीत रहावे म्हणून जनजागृती सुरु केली. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत शेतक-यांना खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (खाऊजा) आणि आपली शेती याबाबत हुशार केले.

कोपरगाव सारख्या ग्रामीण तालुक्यात शिक्षण संस्थांचे जाळे निर्माण केले त्यातून अनेक ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना उच्चशिक्षित बनविले दूध संघ, शेतकरी संघ, कुकुट पालन शेतीमालासाठी शीतगृहे फोरम स्थापना केली त्यांच्या दूरदृष्टीतून कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी त्यांचे फार मोठे योगदान योगदान होते

समाजकारण राजकारण कारखानदारी अर्थकारण शैक्षणिक त्यातून अनेक कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेल आणि कायमचे त्यांचे झाले. काहीही झाले तरी आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी कधीही पोरके होऊ दिले नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत मोठा जनसंग्रह असायचा. कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचाच त्यांचा स्वभाव राहिला.प्रसंगी आपल्याच नेत्यांशी ते संघर्ष करीत, पण कार्यकर्त्यांना त्यांनी कधीही अंतर दिले नाही. त्यामुळे कार्यकर्ते पूर्णत: आश्वस्त असत. , आमदार राज्यात मंत्री अशा अनेक भूमिका त्यांनी वठविल्या. तरीही त्यांच्या क्षमतांचा पूर्ण वापर झाला नाही, असे मला कायम वाटत राहते.

मंत्री असताना कोल्हे साहेबांचा वेगळाच दरार असे. प्रशासनावर घट्ट पकड असायची. कोणताही अधिकारी खोटे बोलण्याची किंवा त्यांना चुकीची माहिती देण्याचा प्रश्नच निर्माण होत नसे. कारण, त्यांना खडा न् खडा माहिती असायची. त्या अर्थाने त्यांना दूरदृष्टी होती.त्यांच्या डोक्यात एक निश्चित असे व्हीजन असायचे.
शंकरराव कोल्हे यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने नामवंत पत्रकाराना ग्रामीण भागातील शेतकरी, पाटपाणी, शेती आणि त्याचे काय प्रश्न असतात याचे नॉलेज देत साखरेचे भाव वाढले म्हणून आकांड तांडव करण्यापेक्षा नामवंत कंपन्यांचे शितपेयं, चहाचे दर यावर चर्चा करा, मेथीच्या भाजीचे दर कडाडले अशी हेडलाईन करण्याऐवजी शेतीच्या समस्या बांधावर जात समजावून घ्या असे सांगितले.भूमिका कोणतीही असो, व्यक्तीनिर्माण अतिशय महत्त्वाचे असते. व्यक्तिनिर्माणात प्रोत्साहनाची भूमिका महत्त्वाची ठरते. असे प्रोत्साहन देण्याचीच भूमिका कोल्हे साहेबांनी कायम घेतली. त्यांचा स्वभावही अतिशय मोकळाढाकळा. एखाद्या शेतकरी पुत्राला शोभावा असाच. त्यामुळे त्यांना भेटलेली व्यक्ती, त्यांची होण्यास वेळ लागत नसे. मनमोकळ्या गप्पा, विनोदबुद्धी, प्रकृती साथ देत नसतानासुद्धा मनाचा तजेला त्यांनी कायम जिवंत ठेवला आणि आजही ते आहेत असेच वाटते .
मुख्यमंत्री होण्याचीही संपूर्ण क्षमता त्यांच्यात होती. पण, ते केवळ स्वप्नच राहिले. विधानसभा त्यांनी गाजविली.

मी अनुभवलेले शंकरराव कोल्हे साहेब

मी आधी शिवसैनिक होतो नंतर सन २००० साली २३ वर्षांपूर्वी मी पत्रकार झालो. या काळात वर्तमानपत्रांचा प्रसिद्धी माध्यम म्हणून मोठा दबदबा होता या काळात स.म. कुलकर्णी, सी.बी. गंगवाल, सुरेश रासकर, अशोक खांबेकर, भागा वरखडे, वसंतराव कपिले, गजानन मंडलिक, अरुण आहेर, महेश जोशी,या पत्रकारांचा त्यांच्याकडे असलेल्या वर्तमानपत्राचा मोठा दबदबा होता कोल्हे साहेबांची एखादी पत्रकार परिषद असली की त्यावेळी मोठमोठाले ज्येष्ठ पत्रकार परिषदेला हजर राहत. त्यावेळेस मी पत्रकार म्हणून व माझा पेपर दैनिक पुण्यनगरी दोन्हीही नवीन व नवखे होतो. काही महत्त्वाचे मुद्द्यावर पत्रकार परिषद असेल आणि मी आल्यानंतर सर्वजण गप्प बसायचे, त्यानंतर त्या पत्रकार परिषदेवर दुसऱ्या दिवशी आलेली बातमी वाचल्यानंतर पुढे साहेब मला म्हणायचे, “या शिवसेनेचे पत्रकार” ; मी म्हणायचो साहेब मी आधी शिवसैनिक होतो. आता पत्रकार झालो आहे. मी इथे फक्त पत्रकारच आहे. असे प्रसंग वारंवार घडत, माझ्या लिखाणानंतर व बातमी लिखाणातील प्रामाणिकपणा पाहिल्यानंतर साहेब स्वतः फोनवरून बोलायचे राजेंद्र बातमी चांगली आली आहे. मला फोन करून पत्रकार परिषदेला ये,असे सांगायचे दुचाकी नसल्यामुळे पत्रकार परिषदेस जाण्यासाठी कधी कधी उशीर व्हायचा तर बाकीचे पत्रकार म्हणायचे साहेब पत्रकार परिषद चालू करा, पण साहेब थांबायचे, दिग्गज पत्रकार असतांना माझ्यासारख्या छोट्या व नवख्या पत्रकाराला याचे खूप अप्रुप वाटायचे, ते म्हणायचे आम्ही म्हणतो म्हणून लिहू नका, तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडले पाहिजे, तुम्ही सुद्धा तालुक्यातील प्रश्नावर स्वतः होऊन लिहिले पाहिजे मला आठवते साहेबांची ७५७५ नंबरची अँम्बेसेडर कार होती. साहेबांचा प्रवासाचा आवाका खूप मोठा होता प्रवासाला असताना नेहमी दै. पुण्यनगरीचा अंक त्यांच्याबरोबर गाडीत असायचा मी अनेकदा पाहिले आहे. कोणता पत्रकार काय लिहितो याची ते तपासणी करत असत चुकले तर पत्रकार परिषदेत ते ती चूक लक्षात आणून देत, आणि प्रसंगी कौतुक करत त्यांचा प्रत्येक विषयावर दांडगा अभ्यास होता कित्येकदा पत्रकारांनी प्रश्न विचारणे ऐवजी तेच प्रश्न उपस्थित करत असत हे विशेष हे मी स्वतः अनुभवले आहे. कोणा पत्रकाराबद्दल कोणी काही जरी सांगितले तर ते स्वतःची खात्री पटल्याशिवाय आपलं मत बनवत नव्हते हा विशेष गुण त्यांच्यात होता.आज त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे.
त्यानिमित्त

“ज्योत अनंतात विलीन झाली,
स्मृती आठवणींना दाटून आली..
भाव सुमनांची ओंजळ भरुनी,
वाहतो ही शब्दश्रद्धांजली..!

Leave a Reply

You cannot copy content of this page