जन्मशताब्दी वर्ष : अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’; केंद्राकडे प्रस्ताव द्या- आ. आशुतोष काळे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले पत्र,
आ. काळेंच्या मागणीचे समाज बांधवांना केले स्वागत, मानले आभार !
कोपरगाव : आपल्या विपुल साहित्यातून दलितांच्या उत्थानासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना, जन्मशताब्दी वर्षानिमित्त
भारत सरकारचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राव्दारे केली.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आ. आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सिंहाचा वाटा आहे. साहित्य क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अजोड असून त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या तब्बल ३६ भाषेत अनुवादित केल्या गेल्या आहेत. कामगार चळवळीत देखील त्यांचा नेहमीच सहभाग राहिला असून कामगारांच्या न्याय हक्कासाठी ते नेहमी सर्वात पुढे होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा अशी अनेक वर्षापासून सर्वच समाज बांधवांची मागणी आहे. १ ऑगस्ट २०२० रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची फक्त जयंतीच नसून त्यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. जर त्यांना यावर्षी पुरस्कार दिला गेला तर तीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली राहणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा या आ. आशुतोष काळेंच्या मागणीचे समाज बांधवांकडून जोरदार स्वागत, क्रांतीगुरु सोशल फौंडेशन महाराष्ट्र राज्य, क्रांतिवीर लहूजी टायगर सेना महाराष्ट्र राज्य, मातंग युवा संघटना कोपरगाव, भारतीय लहूजी सेना, राष्ट्रीय लहूजी सेना, स्वाभिमानी रिपब्लिकन तथा युथ रिपब्लिकन, विराट सामाजिक प्रतिष्ठान शिर्डी, प्रदेशाध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र राज्य, लहूजी शक्ती संघटना आदी संघटनांनी मानले त्यांचे आभार .