अतिवृष्टीने दाणादाण : भोजन व सुरक्षित स्थळी हलवून आ. आशुतोष काळे यांनी दिला आधार
अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी
त्वरित पंचनामे करण्याचे आदेश
वृत्तवेध ऑनलाईन 25 July 2020
By: Rajendra Salkar
कोपरगाव : तालुक्यातील पश्चिमेकडील वायव्य व नैऋत्य या पट्ट्यात शुक्रवारी ढगफुटी सदृश्य झालेल्या अतिवृष्टीने दाणादाण उडाली, असून शेतीसह घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संसार उपयोगी सामान वाहून गेल्याने हताश झालेल्या नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करून तातडीने कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांना सुरक्षित स्थळी हलवून आमदार आशुतोष काळे यांनी त्यांना दिलासा व आधार दिला आहे.
दरम्यान सुरेगाव, शहाजापूर, वेळापूर, मढी बु. माहेगाव देशमुख या परिसराची आमदार काळे यांनी स्वतः पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शहाजापूर, सुरेगाव, वेळापूर माहेगाव देशमुख व मढी बु.परिसरात झालेल्या अतीवृष्टीमुळे हे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. पावसाचे पाणी शेतात देखील मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी, आदी उभ्या पिकांचे नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्यामुळे कांदे भिजले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मढी. बु. येथे आदिवासी वसाहत, सुरेगाव येथे ४० येथील झोपडी परिसर, अंबिकानगर मधील किराणा दुकान, मेडिकल मध्ये, शहाजापूर येथील नागरी वसाहतीमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य भिजले होते. या नुकसानीची आ.आशुतोष काळे यांनी पाहणी करून नागरिकांना धीर दिला. सर्व नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक नागरिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावे असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी गौतम सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन राजेंद्र ढोमसे, माजी उपसभापती वाल्मिक कोळपे, मढी खु. चे सरपंच बापूसाहेब गवळी, उपसरपंच आण्णासाहेब गवळी, शहाजापूरचे सरपंच सचिन वाबळे, उपसरपंच बाळासाहेब ढोमसे, सुरेगाव चे सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच अनिल कोळपे,नुकसानग्रस्त गावचे पोलीस पाटील, तलाठी ग्रामसेवक उपस्थित होते.