१४ एप्रिलपर्यंत ४३ हजारांवर शिधा धारकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटणार -स्नेहलता कोल्हे
Till April 14, 43,000 ration holders will get ‘happy ration’ – Snehalta Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 7 April23 ,19.10 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील सुमारे १ कोटी ६३ लाख रेशनकार्डधारकांना केवळ १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल मिळणार आहे. कोपरगाव तालुक्यात ४३ हजार ५५६ शिधा पत्रिकाधारकांना हा ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येणार असून, लाभार्थींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.
कोपरगाव येथील येवला रोडवरील शारदानगरमधील उल्हास आधारराव पवार यांच्या स्वस्त धान्य दुकान क्र.९५ या ठिकाणी शुक्रवारी (७ एप्रिल) माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते लाभार्थींना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याचा शुभारंभ झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.
पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्वारे १०० रुपये अशा सवलतीच्या दरात हा ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येणार आहे. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा देण्याची सुविधा प्रशासनाने केली आहे.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देत, वेगाने निर्णय घेत गतिमान पद्धतीने काम करत आहे. सरकारने महिला, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, दिव्यांग, व्यापारी अशा सर्व समाजघटकांच्या हिताला प्राधान्य देत अनेक योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत. जनहिताच्या योजना न राबविणाऱ्यांना या सरकारवर टीका करण्याचा कसलाही अधिकार नाही, अशी टीका स्नेहलताताई कोल्हे यांनी केली.
यावेळी शकुंतला पवार, शोभा उल्हास पवार, बाळू पवार, जितेंद्र रणशूर, रुपाली शिंदे, वर्षा पवार, मंगला गायकवाड, बेबी चौधरी, अर्चना ओहर, बाळासाहेब होन, उल्हास भदाणे, किरण थोरात, रोहित पाटील आदी उपस्थित होते. केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना राबवत आहे. शिंदे-फडणवीस सरकारने अवघ्या १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेतल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाल्याचे सांगून लाभार्थी महिलांनी यावेळी सरकारचे आभार मानले.
Post Views:
130