“कोपरगाव डेपोची ‘खिळखिळी’ बससेवा; पुणे प्रवास ठरला प्रवाशांसाठी शिक्षा!”
Kopargaon Depot’s ‘Dilapidated’ Bus Service: The Journey to Pune Becomes a Punishment for Passengers!
पहाटेची बस अस्तगाव फाट्यावर बंद, दुसरी बस घारगावजवळ पंचर; अडीच तास उशीर — प्रवाशांचा संताप, प्रशासनाची नेहमीचीच ‘समजूत’
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 22Sun.18.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :एसटी महामंडळाच्या ढिसाळ व्यवस्थेचा फटका प्रवाशांना पुन्हा एकदा बसला असून कोपरगाव डेपोचा कारभार अक्षरशः उघड्यावर आला आहे. काल पहाटे ५.३० वाजता कोपरगावहून पुण्याकडे निघालेली बस अस्तगाव फाट्यावरच बंद पडली आणि प्रवाशांचा प्रवास पहिल्याच टप्प्यात ठप्प झाला.
यानंतर प्रवाशांना सकाळी ७ वाजताच्या दुसऱ्या बसने पुण्याकडे रवाना करण्यात आले. मात्र, ही बसही घारगावजवळ पंचर झाल्याने प्रवाशांचा संयम सुटला. अखेर अडीच तास उशिराने पुण्यात पोहोचलेल्या प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया देत एसटीच्या कारभारावर ताशेरे ओढले.
“एकाच दिवशी दोन-दोन गाड्यांचा त्रास सहन करावा लागतो, हा प्रवास की शिक्षा?” असा सवाल प्रवाशांनी उपस्थित करत लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी सक्षम आणि दर्जेदार बसेसची मागणी केली.
दरम्यान, या प्रकाराबाबत कोपरगाव आगार प्रमुख अमोल बनकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “आगाराकडे सध्या दहा नवीन बसेस उपलब्ध आहेत. मात्र त्या हैदराबाद, माहूर, कोल्हापूर, गाणगापूर अशा लांब पल्ल्याच्या मार्गांवर चालवल्या जातात. पुणे मार्गासाठीही चांगल्या बसेस उपलब्ध आहेत. परंतु रस्त्यावर गाड्या धावत असल्याने कधी कधी अशा तांत्रिक अडचणी निर्माण होतात. तरीही आगाराकडून आणखी नवीन बसेसची मागणी करण्यात आली असून त्या लवकरच सेवेत दाखल होतील,” अशी माहिती त्यांनी दिली.
मात्र, अधिकाऱ्यांची ही भूमिका म्हणजे ‘नियमित बिघाडाचे समर्थन’ असल्याची टीका प्रवाशांतून होत आहे. वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे प्रवाशांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढत असून एसटी प्रशासनाने आता तरी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
अन्यथा ‘प्रवासी राजा’ ही घोषणा केवळ कागदावरच राहणार, हे निश्चित!
Post Views:
7





