मंत्री मुंडे साहेब; कोपरगाव बाजार समितीला पाच हेक्टर जागा द्या,- आ आशुतोष काळे
Minister Munde Saheb; Give five hectares of land to Kopargaon Bazaar Committee, – Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu20July24,19.20Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नवीन कांदा मार्केट व डाळिंब मार्केट सुरु केल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा अपुरी पडत असल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे ५ हेक्टर क्षेत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला द्यावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल वाढत असून शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रतिसादामुळे सद्यस्थितीत जागेची मोठी अडचण निर्माण झाली असून शेतकऱ्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जागेची अडचण सोडविण्यासाठी कोपरगाव शहरातील महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या नावे असलेली गट नं. १९, २०, २१ व २४ एकून क्षेत्र १९ हेक्टर ८ आर क्षेत्रापैकी ५ हेक्टर क्षेत्र कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळावे याबाबत लेखी मागणी केली आहे. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेवून सदरचे ५ हेक्टर क्षेत्र कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तातडीने हस्तांतर करण्यास सबंधित विभागास सूचना द्याव्यात अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
तसेच कृषी विभागाच्या अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये महा डी.बी.टी. पोर्टलद्वारे ७७० शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना निहाय मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या मंजुरीनुसार या शेतकऱ्यांना मिळणारे रु.३ कोटी ४८ लाख ६३ हजार रुपये अनुदान आजपर्यंत सबंधित शेतकऱ्यांना मिळालेले नाही. चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून खरीप पिकांची पेरणी केली आहे परंतु पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून शेतकरी अत्यंत अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजनेचे थकीत अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळाले पाहिजे. याबाबत कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याशी आ. आशुतोष काळे यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी लवकरात लवकर थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी ग्वाही कृषी मंत्र्यांनी दिली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.