कोपरगाव मतदार संघात कोरडा दुष्काळ जाहीर करा-आ. आशुतोष काळे

कोपरगाव मतदार संघात कोरडा दुष्काळ जाहीर करा-आ. आशुतोष काळे

Declare drought in Kopargaon Constituency. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 21Aug24,16.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव  :- चालू खरीप हंगामात राज्यात विविध भागात जरी चांगला पाऊस पडलेला असला तरी मात्र कोपरगांव विधानसभा मतदार संघात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मतदार संघात पावसाने काही ठिकाणी २१ दिवसांपासून २५ दिवसांपर्यंत उघडीप दिल्याने पिके वाळून चालल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही याची गांभीर्याने दखल घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, चालू हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने मतदार संघात खरीप पेरण्या होतील की नाही याबाबत शेतकरी साशंक होते. परंतु पडलेल्या अत्यल्प पावसावर जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होवून बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या मात्र पेरण्या झाल्यानंतर पेरलेले बियाणे उगवणार की नाही अशी एकवेळ अवस्था होती. परंतु कसेबसे पेरलेले उगवले व सर्वच पिके जोमात असतांना पुन्हा पावसाने ओढ दिल्यामुळे मागील २५ दिवसापासून मतदार संघातून पाऊसच गायब झाल्यामुळे निसर्गाचा लहरीपणा काय असतो? याचा प्रत्यय यंदाच्या खरीप हंगामात कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना आला आहे. याचा मोठा परिणाम खरीप पिकाच्या उत्पादनावर होणार असून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांचे पैसे आणि मेहनत दोन्हीही वाया जाणार असून अगोदरच अडचणीत असलेला बळीराजा आर्थिक अडचणीत सापडणार आहे.  

पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पर्जन्यमान  झालेले नाही. पेरणी होताच धो-धो बरसणारा वरुणराजा यावर्षी ऐन गरजेच्या वेळी गायब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप तर जाणारच आहे परंतु सरासरीहून कमी पाऊस झाल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली जावून भविष्यात शेतकऱ्यांना जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याच्या समस्या उद्भवणार आहे. अशा चिंताजनक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कोपरगाव मतदार संघात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा. खरीप हंगामातील बाजरी,मका,  कापूस,  तूर, सोयाबीन,भुईमुग, कांदा आदी पिकांचे १०० टक्के नुकसान होणार असल्यामुळे आगावू पिक विमा रक्कम सरसकट द्यावी. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. अनिल पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page