काळे कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी परिसंवाद व चर्चा सत्र संपन्न
Seminar and discussion session concluded for sugarcane farmers on kale factory
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon 1Jan 24, 19.10Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या शेतकी व ऊस विकास विभागामार्फत कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कामगार पतपेढीच्या कर्मवीर शंकरराव काळे सभागृहात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल परिस्थितीत खोडवा ऊस व्यवस्थापन व जमीन सुपीकता व्यवस्थापन या विषयावर शेतकरी परिसंवाद व चर्चा सत्र पार पडले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ऍग्रोनॉमिस्ट डॉ.अभिनंदन पाटील व सायंटिफिक ऑफिसर डॉ. समाधान सुरवसे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून खोडवा पिकाचे महत्त्व सांगितले. डॉ.अभिनंदन पाटील यांनी नवीन ऊस लागवडीसाठी ऊस बेणे निवडीचे महत्व, ऊस तुटल्यानंतर तुटलेल्या ऊसाचे पाचट न जाळता ते जमिनीतच कुजविण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच बुडखा छाटणीचे महत्त्व व अवर्षण काळात ऊसपिकाने तग धरावा यासाठी वसंत ऊर्जा, केओलिन व पोटॅशची फवारणी करावी. तसेच पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन व रोग, किडी बद्दल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकाचे योग्य पद्धतीने निरसन केले.
डॉ. समाधान सुरवसे यांनी जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी रासायनिक खतांची मात्रा ऊस पिकास किती द्यावी व त्या बरोबर सेंद्रिय खतांचा वापर, चोपन जमिन सुधारण्यासाठी चर काढणे, माती परीक्षण करणे व ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी कारखाना निर्मित कर्मवीर बायोअर्थ या सेंद्रिय खताच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी वीस गोणी ना नफा ना तोटा या तत्त्वावर लवकरच उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे,गौतम बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते, राजेंद्र घुमरे, अनिल कदम, श्रीराम राजेभोसले, शंकरराव चव्हाण, गंगाधर औताडे, दौलतराव मोरे, सुभाष गवळी आदी मान्यवरांसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी आण्णासाहेब चिने यांनी केले.सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर आभार सभासद दत्तात्रय शिंदे यांनी मानले.