शिवाजीराव संधान एक सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व
Shivaji Rao Sandhan is a versatile personality
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 11Jan 24, 18.00Pm.By राजेंद्र सालकर
श्री शिवाजी आनंदराव संधान, माजी संचालक संजीवनी सहकारी साखर कारखाना तसेच विश्वस्त संजीवनी एज्युकेशन संस्था यांचे दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यानिमित्त त्यांचे बाबत आठवणींना उजाळा देण्यासाठी सदर लेख लिहिला असे.
खडतर जीवन-
सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या, शिवाजीराव संधान यांचे नाशिक जिल्ह्यातील दहिवाडी (ता. सिन्नर) हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे शालेय शिक्षण नासिक येथे नातेवाईक असलेल्या कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्याकडे झाले. पुढे त्यांनी कोपरगाव सहकारी साखर कारखान्यात (कोसाका) शेती विभागात नोकरीला सुरुवात केली. सेवेत असताना, वेळ प्रसंगी प्रस्थापित नेतृत्वा विरुद्ध जाऊन त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला.या काळात कामगार प्रिय नेतृत्व – म्हणूनच पुढे त्यांना कोसाका पतपेढीत प्रथम संचालक व नंतर चेअरमन पदाचा सन्मान मिळाला. या काळात कामगारांची पतपेढी नावारुपाला आणतानाच्या किराणा, कापड विक्री, गॅस पुरवठा हे पूरक उद्योग,सुरू केले. सोसायटीचा” अ” दर्जा सतत जोपासला. सभासदांना खरेदीच्या प्रमाणात नफा देण्याची योजना कामगारात विशेष लोकप्रिय झाली. व जवळपास ३० वर्षे सेवेनंतर ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर कै. शंकरराव कोल्हे यांचे ते अत्यंत विश्वासु व निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून त्यांना संजीवनी साखर कारखान्याचे संचालक होण्याचा बहुमान मिळाला, त्या काळातही त्यांनी सभासद शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास पुढाकार घेतला तसेच अनेक बेरोजगार गरजू युवकांना नोकरी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवाजीराव हे” अप्पा” नावानेच जास्त परिचित होते. आबालवृद्ध त्यांना” अप्पा” नावानेच संबोधित असत.
बहुतांची अंतरे-
कोसाका व संजीवनी कारखान्याच्या निवडणुकीत त्यांचा महत्त्वपूर्ण रोल असायचा या दरम्यान शिवाजीराव यांचे घरी, कोळपेवाडी येथे कार्यकर्त्यांचा सतत राबता असायचा. पंचक्रोशीत त्याचा दांडगा लोकसंपर्क होता. सर्वसामान्यांच्या सुख-दुखात ते सतत सहभागी असायचे. नोकरीत असताना त्यांनी अत्यंत प्रामाणिक व राजकारणात शंकरराव कोल्हे यांचे विश्वस्त म्हणून भूमिका पार पाडली. नोकरी व राजकारणयाची त्यांनी कधीही सरमिसळ न करता प्रत्येक भूमिकाला यथा योग्य न्याय दिला.
एक यशस्वी उद्योजक –
शिवाजीराव हे सुरुवातीपासून उद्योग व्यवसाय प्रिय होते. त्यांनी कोसाका मधील सेवा काळात ट्रकचा व्यवसाय सुरु केला त्यात त्यांना यश आले. त्यानंतर त्यांनी अहोरात्र कष्ट करून हा व्यवसाय वाढविला व पुढे वृद्धिंगत केला.
शिस्तप्रिय स्वभाव –
शिवाजीराव अत्यंत शिस्तप्रिय होते अन्याय व खोटेपणा त्यांनी कधीच सहन केला नाही. स्वच्छ चारित्र त्यांचे रक्तात असल्यामुळे अत्यंत स्पष्ट वक्तेपणा व निर्भिड व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रसिद्धी होती.
एक दिलदार खिलाडू –
शिवाजीराव हे उत्कृष्ट हॉलीबॉलपटू होते. ड्युटी नंतर हॉलीबॉल खेळण्यात, खेळाचे सामने भरवण्यास त्यांचा हातखंडा होता. श्री शिवाजीराव वाबळे हे तत्कालीन त्यांचे मित्र व सह खेलाडू होते व दोघांची मैत्री सर्वश्रुत आहे.
पारखी नजर –
शिवाजीराव हे कुणाही व्यक्तीचे गुण, दोष, धडाडी, ई बाबत पारखी होते. त्यांचे अंदाज कधीच चुकले नाही. गरीब पण होतकरू तरुणांना मदत करण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असे.
परिपूर्ण कौटुंबिक जीवन –
शिवाजीराव यांना चार मुली असून त्यांचे जावई हे त्यांच्या क्षेत्रात अत्यंत उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांचे मोठे जावई डॉ. नानासाहेब जगताप हे पुणे येथील एका प्रगतिशील उद्योग व्यवसायात जोडलेले आहेत. दुसरे जावई डॉ. नानासाहेब गायकवाड हे रयत शिक्षण संस्थेचे महाविद्यालय, मंचर येथे प्राचार्य आहेत. तसेच ते रयत शिक्षण संस्थेचे माजी सह-सचिव होते. तसेच तिसरे जावई शरद गटकळ हे अकोले येथे विदर्भ ग्रामीण बँकेत रिजनल मॅनेजर आहेत तर चौथे जावई किरण शिंदे मुंबई येथे मंत्रालयात प्रशासन विभागात अंडर सेक्रेटरी यापदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मुलीही उच्चशिक्षिता असून त्यातील काही नोकरी करतात किंवा व्यवसाय करतात. त्यांचे नातवांपैकी कोणी डॉक्टर, कोणी इंजिनिअर, वकील, आयटी एस, आय. आय. टी., आय.बी.एम.ई.ई. उच्चशिक्षीत आहेत
एकुलते एक चिरंजीव पराग संधान –
कोपरगावातील एक लोकप्रिय युवा नेतृत्व, शिवाजीराव यांचे संस्कार त्यांना लाभलेत व पुढील आयुष्यात त्यांना ते उपयोगी ठरले. शिवाजीरावांच्या तालमीत त्यांना बाळकडू मिळाले. लोकानुनय कसा ठेवावा, वाढवावा उद्योग व्यवसाय कसा करावा याचे धडे मिळाले व त्याच शिदोरीच्या आधारे पराग यशस्वी वाटचाल करीत आहेत. हा सर्व गौतावळा बघून, त्यांना निश्चितच अभिमान वाटत असे. शिवाजीराव यांचे यशस्वी जीवन वाटचालीत त्यांची पत्नी सौ. सुमनताई यांनी शेवटपर्यंत भक्कम साथ दिली. त्यांनी कौटुंबिक जबाबदारी यशस्वी रित्या सांभाळली. तसेच स्नुषा सौ. मोनिका यांनी अप्पाची सतत काळजी घेतली. नातू मुकुल व पियुष याचेवर अप्पांचा फार जीव होता.