लोखंडी अँगल चोरीतील तीन आरोपी जेरबंद; पिकअपसह साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त
Three accused in iron angle theft arrested; Pick-up and valuables worth Rs. 4.5 lakh seized
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! , Sun12 Jan 25 19.20 pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव:समृद्धी महामार्गावरून ६५ हजार रुपये किमतीचे १८६ लोखंडी अँगल चोरणाऱ्या आरोपींना तालुका पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडील पिकअप वाहनासह ४ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सागर हनुमंत आहेर, अशोक बळीराम आहेर, लोखंड विकत घेणारा विजय संजय मुळेकर या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. तिन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली.
आठ जानेवारी रोजी समृद्धी महामार्गाचे सुपरवायझर मोहन निगडे यांनी चोरीची फिर्याद दाखल केली होती. पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी तपासाची चक्रे फिरवत गुप्त बातमीदाराच्या साहाय्याने गती दिली.
पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, रशीद शेख, प्रकाश नवाळी, किसान सानप, मधुसूदन दहिफळे यांचे पथक तयार करून सापळा रचला. त्यात आरोपी सागर हनुमंत आहेर (वय २४), अशोक बळीराम आहेर (वय २९, रा. आहेर वस्ती, भोजडे) यांना अटक केली.
गुन्ह्यातील आरोपींनी सदर माल कोणाला विकला याबाबत अधिक चौकशी केली असता त्यातील आरोपी विजय संजय मुळेकर (रा. शिवाजीनगर, दहेगाव बोलके) याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्यातील १८६ लोखंडी अँगल, चार लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले आहे.





