काळाच्या पुढे जात विचार करणारे नेतृत्व माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे 

काळाच्या पुढे जात विचार करणारे नेतृत्व माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे 

Leadership that thinks caste ahead of time former minister late. Shankarrao Kolhe 

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार भाग २ 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Mon 5 May 18.30 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगांव : अहिल्यानगर जिल्हा हा नेतृत्वाची खाण येथे सहकाराची पाळेमुळे रूजली. सहकारी तत्त्वावरील साखर कारखानदारी राज्यात सर्वप्रथम या जिल्हयात बहरली. या जिल्हयात सहकार क्षेत्रात काम करणा-या व्यक्ती राज्याच्या राजकारणांत निश्चितच चमकल्या असत्या मात्र कालपरत्वे त्यांना तशी संधी मिळाली नाही पण या मातब्बर राजकारणी नेतृत्वाने आपापले तालुके समृध्द करत त्या भागाचा विकास केला त्यात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे नांव अग्रहक्काने घेतले जाते.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या जीवनाचा संघर्ष मोठा आहे. त्यांनी सहकारक्षेत्रात केलेले कार्य राज्यासह देशाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार भाग २ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. काळाच्या पुढे जात विचार करणारे नेतृत्व म्हणजे शंकरराव कोल्हे होय. संजीवनी सहकारी साखर कारखान्यात त्यांनी काळाच्या कितीतरी अगोदर उस कारखानदारीतील प्रयोगात्मक प्रकल्प सहकाराच्या माध्यमातुन उभे केले, यथार्थपणे चालविले, सभासद शेतक-यांची उन्नती साधली आणि उद्याच्या येणा-या अनंत पिढयांसाठी मार्गदर्शनाचा ठेवा निर्माण केला त्यामुळे स्व. शंकरराव कोल्हे व्यक्ती नसुन एक विचार आहे हेच यातुन वाचकांसमोर उभे राहते.
            संपादक महेश मधुकर जोशी, संकलक लेखक वीरेंद्र व मयुर मधुकर जोशी या तिघा भावांनी गेल्या वर्षी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार भाग १ पुस्तक प्रकाशित केले होते याही वर्षी (११ मार्च २०२५) माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी विविध वर्तमानपत्रात लिहीलेल्या लेखांचे संकलन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार भाग २ या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
              सध्याचा काळ मुक्त अर्थव्यवस्थेचा आहे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार करार आणि शेती यात भारतीय शेतक-याला संरक्षण कसे मिळेल हा हेतु स्व. शंकरराव कोल्हे यांनी कितीतरी अगोदर मांडला त्यात विकसीत विरुध्द विकसनशील लढाईत आपण टिकु की टिकणार नाही आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याची माहिती दिली.
             प्रस्तृत पुस्तकात स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारांची नेमकी दिशा काय आहे याचा बोध होतो. महामंडलेश्वर सिध्देश्वर देवस्थान मंजुर (कोपरगाव) येथील दत्तात्रेयरत्न शिवानंदगिरी महाराज यांची प्ररेक प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे. काम हाच परमेश्वर या स्वभावगुणांने शंकरराव कोल्हे यांनी अध्यात्मापेक्षा कामाला प्राधान्य दिले आहे. कामात अध्यात्माचा राम शोधला.  शंकरराव कोल्हे यांनी शेती आणि पाणी या प्रश्नांवर सातत्याने लढे दिले, स्वतःच्या सरकारविरूध्द रस्त्यावर येत संघर्ष केला त्याची उदबोधक रंगीत छायाचित्रे त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे शेती कर्जाचे व्याज कमी व्हावे यामागणीसाठी शेतक-यांचा नेलेला रूम्हणं मोर्चा यातुन स्व. शंकरराव कोल्हे वाचकाच्या डोळयासमोर उभे राहतात. हस्ताक्षराने मनुष्याचा स्वभाव कळतो, तिळवणी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा वाचनालयास स्व. शंकरराव कोल्हे यांनी ३० डिसेंबर २००७ रोजी भेट दिली त्यावेळच्या लिखीत संदेशामुळे साहेबांचे हस्ताक्षर याची कल्पना येते.
              स्व. शंकरराव कोल्हे यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतीक, सहकार, बँकींग आदी क्षेत्रात काम करतांना सहकारी दुध संघांना सरकारी संरक्षणाची आवश्यकता, खुली अर्थव्यवस्था आणि विकसनशील देश, आर्थीक महासत्तेसाठी जिददच हवी, शेतक-यांच्या आत्महत्या पॅकेज देवुन थांबणार नाही, जिल्हा बँकेमुळे कृषी क्रांती, अडचणींच्या शर्यतीतील साखर उद्योग, सहकारासमोर आव्हान खाजगीकरणाचे, ज्येष्ठांच्या भावना, अमृत महोत्सवी महाराष्ट्राचे विधीमंडळ, दुष्काळ निवारण्यासाठी शेततळी महत्वाची, शेती सहकार आणि ऋणानुबंध, आठवणीतले अधिवेशन याविषयी लिहीलेल्या लेखांची समग्र माहिती वाचावयास मिळते. याशिवाय स्व. शंकरराव कोल्हे यांच्या सहचारीणी श्रीमती सिंधुताई शंकरराव कोल्हे यांनी साहेबांविषयी लिहीलेल्या आठवणींचे संकलन प्रा. साहेबराव दवंगे यांनी यथार्थपणे मांडले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचे माजी महाव्यवस्थापक वि. पा. राणे, विवेक पुरंदरे, महेश जोशी, प्रा. रतनलाल सोनाग्रा, महादेव कुलकर्णी, सीताराम चांडे यांनीही स्व. शंकरराव कोल्हे यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलु आपल्या लेखनातुन या पुस्तकात मांडले आहे. काशिनाथ वहाडणे, रमेश राहणे, हेमचंद्र भवर, राजेंद्र सालकर, मनोज जोशी, शरद थोरात यांना स्व. शंकरराव कोल्हे यांच्याबददल आलेल्या अनुभवांचे विचार स्वतःच्या शब्दात व्यक्त केले. त्यामुळे हे पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे. स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेल्या साई संजीवनी सहकारी बँक व संजीवनी पतसंस्था व्यवस्थापन, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी सदरचे पुस्तक संग्रहार्थ रहावे म्हणून आपल्या संचालकांना भेट दिले आहे. मधुशोभा प्रकाशनने अत्यंत सुबक मांडणी करत पुस्तक प्रसिध्द करून स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. २४ मार्च १९२९ जन्मापासुन ते २०२२ मृत्युपर्यंतचा स्व. शंकरराव कोल्हे यांचा प्रवास व्यक्तीगत जीवनपटांने आणखी खुलला आहे.
(राजेंद्र सालकर)

Leave a Reply

You cannot copy content of this page