राघोबादादा वाड्यास अखेर ‘सरकारी जीवदान’; ३.६२ कोटींचा निधी मंजूर!

राघोबादादा वाड्यास अखेर ‘सरकारी जीवदान’; ३.६२ कोटींचा निधी मंजूर!

Raghobadada Wada Finally Receives a ‘Government Lifeline’; ₹3.62 Crore Funding Sanctioned!

सततच्या पाठपुराव्याला यश; इतिहास वाचवण्यासाठी नगराध्यक्ष पराग संधान यांच्या कडून सरकारला आभार 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 20Fir.19.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :कोपरगाव शहराच्या ऐतिहासिक ओळखीचा कणा असलेल्या राघोबादादा वाड्याच्या जतन-दुरुस्तीसाठी अखेर राज्य शासनाने ३ कोटी ६२ लाख २३ हजार १५० रुपयांचा निधी मंजूर करत ‘उशिरा का होईना’ योग्य निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष पराग संधान यांनी व्यक्त केली. मात्र, इतक्या महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूकडे इतकी वर्षे दुर्लक्ष का झाले, अशी खंत व्यक्त करतानाच  सरकारचे आभार देखील व्यक्त केले आहे.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयान्वये वाड्याच्या दुरुस्तीला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, या निधीमुळे आता वाड्याचे जतन आणि पुनरुज्जीवन होणार आहे. “इतिहास जपायचा असेल, तर केवळ घोषणा नव्हे तर ठोस कृती हवी,” असा टोला देखील संधान यांनी लगावला.

राघोबादादा वाडा हा केवळ कोपरगावच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा ठेवा आहे. या वास्तूची ख्याती जिल्ह्याबाहेरही पोहोचलेली असताना, तिची झालेली पडझड ही प्रशासनाच्या उदासीनतेचे प्रतीक असल्याची टीकाही संधान यांनी केली.

दरम्यान, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या वाड्याच्या संवर्धनासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत निधी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, “जनतेच्या भावना लक्षात घेऊन घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असला, तरी भविष्यात अशा वारसा वास्तूंना वेळेत न्याय मिळायला हवा,” अशी स्पष्ट भूमिका संधान यांनी मांडली.

आता या निधीतून होणाऱ्या कामांकडे संपूर्ण कोपरगावकरांचे लक्ष लागले असून, ‘इतिहास जपला जाईल की पुन्हा कागदोपत्रीच राहील?’ हे पाहण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page