शिर्डीत आदिवासी विकास कार्यालयासाठी आग्रह धरणार – आ. आशुतोष काळे
Will insist on a tribal development office in Shirdi – MLA Ashutosh Kale
कोपरगावात भगवान एकलव्य स्मारकासाठी एक कोटीचा निधी मिळाला
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्या खालोखाल राहता तालुक्यात आहे यामुळे दोन्ही तालुक्याचा विचार करता शिर्डीत आदिवासी विकास कार्यालय व्हावे यासाठी पालकमंत्री व आदिवासी मंत्री यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले आहे.
समाज हा आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. अकोला तालुक्यानंतर सगळ्यात जास्त आदिवासी समाजाची लोकसंख्या कोपरगाव तालुक्यात आहे त्याचबरोबर राहाता तालुक्यात देखील आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.आदिवासी विकास कार्यालय हे अकोला येथे असल्याने प्रशासकीय दृष्टीने अनेक वेळा आदिवासी समाजबांधवांना अंतर, वेळ आणि सोयीसुविधांच्या कमतरतेचा सामना करावा लागतो व अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील आदिवासी समाजबांधवांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शिर्डीला आदिवासी विकास कार्यालय व्हावे हि माझी भूमिका असून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.व आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
शनिवार (दि.०९) रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन आ.आशुतोष काळे यांनी त्यांना वंदन केले. यावेळी आदिवासी समाज बांधवांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,कोपरगाव तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांसाठी १२५ घरकुल आदिवासी विकास विभागाकडून मंजूर आणले आहे.परंतु आदिवासी बांधवाना घरकुलासाठी जागेची मोठी अडचण आहे. त्याबाबत शासन स्तरावर असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या समवेत बैठक घेवून आदिवासी बांधवांना घरकुल मिळवून देणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
आ.आशुतोष काळे यांची शिर्डीला आदिवासी विकास कार्यालय व्हावे हि भूमिका आणि हा प्रयत्न फक्त प्रशासकीय बदल नाही, तर आदिवासी समाजाचा सन्मान, सोय आणि हक्क यासाठी पुढे टाकलेले एक पाऊल आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांच्या प्रश्नांना नवी दिशा आणि वेग मिळेल, याची खात्री कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येक आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर यावेळी दिसत होती.
या कार्यक्रम प्रसंगी आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :-
मतदार संघातील तमाम आदिवासी बांधवांच्या मागणीची दखल घेवून केलेल्या पाठपुराव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार यांनी भगवान एकलव्य यांच्या स्मारकासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. भगवान एकलव्य यांचे होणारे स्मारक हे भव्य दिव्य करायचे आहे. कोपरगाव शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या धारणगाव रोड येथे मध्यवर्ती ठिकाणी भव्यदिव्य स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी समिती देखील तयार करण्यात आली असून समितीने सर्व समाज बांधवांच्या सहमतीने स्मारक कसे असावे याबाबत विचारविनिमय करून निर्णय घ्यावा.-आ. आशुतोष काळे.





