अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत जास्त मदत द्या,आ.आशुतोष काळेंचे अजित पवारांना साकडे
Give more help to farmers in trouble due to heavy rain, A. Ashutosh Kale urges Ajit Pawar
मुंबईत भेटून दिले प्रत्यक्ष निवेदन
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu 2 Oct 18.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :मतदार संघात मागील आठवड्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली असून त्यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे.अशा कठीण परिस्थतीत शेतकऱ्यांना पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन शासनाकडून तातडीने मदत द्या असे साकडे आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार यांना घातले आहे.
आ.आशुतोष काळे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार यांची भेट घेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरीकांना जास्तीत जास्त मदत द्यावी याबाबत निवेदन दिले. यावेळी त्यांनी सविस्तरपणे चर्चा करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. कोपरगाव मतदारसंघात शनिवार (दि.२७) व (दि.२८) रोजी सलग अठरा तास झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीचा फटका मतदार संघातील गावांना बसून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच छोट्या मोठ्या ओढ्या नाल्यांना पूर आल्यामुळे ऊस पिके व फळबागांचे नुकसान होवून हे पुराचे पाणी नागरीकांच्या घरात तसेच दुकानात शिरल्यामुळे अनेक घरांची पडझड होवून संसारापयोगी साहित्याचे खूप नुकसान झाले आहे.अनेक शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी, कापूस, तूर, चारा पिके आदी शेकडो हेक्टर पिकांचे शंभर टक्के नुकसान होवून खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही.
त्यासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून तातडीने मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वीही आपल्या सहकार्यामुळे मतदार संघातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य नुकसान भरपाई मिळालेली आहे. यावेळी देखील झालेल्या नुकसानीची जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. सदर मागणीला उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव आल्यानंतर तातडीने कार्यवाही करून जास्तीत जास्त मदत मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
Post Views:
60





