विखे – परजणेगटामधील बैठकीनंतर राजकीय चर्चांना उधाण; स्वतंत्र निवडणुका लढण्याच्या शक्यतेला बळकटी,
Political discussions heat up after meeting in Vikhe – Parjanegata; Possibility of contesting independent elections strengthened,
परजणे म्हणतात ‘वेट ॲन्ड वॉच’; पण तिसरी शक्ती दुर्लक्षित करून चालणार नाही
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Su11Oct 19.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : नुकतीच विखे परजणे समर्थकांची बैठक पार पडली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तोंडावर ही बैठक पार पडल्याने या बैठकीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे विखे परजणे स्वतंत्र निवडणुका लढविण्याच्या शक्यतेला बळकटी आली आहे.
दोन दिवसांपूर्वी एका गुप्त ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या नेतृत्वाखाली विखे आणि परजणे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीस शहरासह मतदारसंघातील सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीबाबत कमालीची शांतता पाळण्यात आली असून बैठकीतील चर्चा देखील गुलदस्त्यातच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घोषणेनंतर झालेले या बैठकीमुळे स्वतंत्र निवडणुका लढण्याच्या शक्यतेला पुन्हा बळकटी मिळाली आहे. महायुती असूनही कार्यकर्त्यांना कायम डावलण्यात आल्यापासून मतदार संघात विखे व परजणे गट प्रचंड नाराज आहेत. त्यांनी ही नाराजी वारंवार उघडपणे बोलून दाखविली. मध्यंतरीच्या काळात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला गृहीत धरून पुन्हा एकदा आपली फसगत होऊ नये यामुळे विखे परजणे गट सावध झाला असून कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेण्याच्या अपेक्षा व्यक्त केली असल्याचे समजते.
दरम्यान आगामी सर्वच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच विखे – परजणे गटाच्या कार्यकर्त्यांच्या नुकत्याच झालेल्या या बैठकीला विशेष महत्व दिले जात आहे. आगामी निवडणुकांच्या प्रक्रियेत आम्हाला स्वातंत्र्य द्या अशाही प्रतिक्रिया काही कार्यकत्यांनी व्यक्त केल्याचे समजते. नेमकी रणनीती काय ठरली हे जरी आज बाहेर कळू शकले नाही तरी सर्वसाधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विखे परजणे गटाकडून अनेकांना उमेदवारीची अपेक्षा आहे काहीजण तर थेट शड्डू ठोकून तयार आहेत. एकतर ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने आम्हाला संधी द्या, म्हणून विखे परजणे गटाच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांवर दबाव सुद्धा वाढत आहे.तशी कोपरगाव मतदार संघात विखे परजणे यांची ताकद निश्चित दखल घेण्याइतकी मोठी असल्याने या बैठकीस मतदार संघातील गावनिहाय कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आज जरी बैठकीतील चर्चा गुलदस्त्यात असली तरी विखे परजणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तिसरी शक्ती असल्याने राजकीय चर्चेला नक्कीच उधाण आले आहे.
या प्रश्नावर राजेश परजणे यांना याबाबत छेडले असता त्यांनी सांगितले. आमची बैठक वेगळ्या विषयावर होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सध्यातरी कोणताही निर्णय न घेता परिस्थितीचा अंदाज घेत आहोत. बघूया, तुर्तास “वेट अँड वॉच’असे म्हणत त्यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी विखे परजणे ही कोपरगाव मतदार संघात तिसरी शक्ती आहे हे दुर्लक्षित करून चालणार नाही हेही तितकेच खरे !
चौकट
यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांची झालेली प्रचंड हानी आणि संकटात सापडलेल्या शेतक-यांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नुकसान भरपाई संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे समजले. याबरोबरच कोपरगाव तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, अरोग्य तसेच दुग्धव्यवसायाबरोबरच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना बैठकीत व्यक्त केल्याचेही वृत्त आहे
Post Views:
50





