जा रे जा रे पावसा… आता खरंच तुला देतो पैसा!”
Go, go, rain… Now I really give you money!”
आभाळ फाटलं, निसर्गाचा प्रकोप, हवामान खात्याचा खरा ठरणारा अंदाज; उध्वस्त शेती, थकलेला शेतकरी, हतबल सरकार
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue27Oct 16.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : एकेकाळी अंगणात आई लेकरासोबत गात असे “ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा…”त्या गाण्यात आशा होती, हिरवाईचा सुगंध होता.पण आज “जा रे जा रे पावसा, तुला देतो पैसा…” असे म्हणण्याची वेळ आली आहे.कारण पावसाचं रूप आता भीतीचं, विनाशाचं आणि असहायतेचं झालं आहे.
मे महिन्यापासून सुरू झालेला मुसळधार पाऊस सहा महिन्यांपासून थांबायचं नाव घेत नाही.श्रावण सरी कधीच विरून गेल्या, तर स्वातीतील मोती पिकण्याआधीच वाहून गेले.धरणं ओसंडली, जायकवाडी सारखं महाकाय धरण चार वेळेस भरून ओसंडून वाहिलं, ओढे तुडुंब भरले, पुलं-बंधारे वाहून गेले, आणि शेती उद्ध्वस्त झाली.
शेतकऱ्यांच्या आयुष्याचं गणित कोलमडलं आहे.“थोडा कमी होईल” या आशेवर जगणारे शेतकऱ्यांना आता निराशेने घेरलं आहे. हवामान खात्याचा अंदाज इतका अचूक ठरू लागला आहे की तो ऐकूनच लोकांच्या चेहऱ्यावर भीती उमटते.
शेतीबरोबरच शहरांचंही जगणं पुरतं भिजलं आहे.रस्ते खड्ड्यांनी भरले, गटारे ओसंडली, दुकाने-पट्टी पाण्याखाली गेली.पावसानंतरचा उकाडा आणि पुन्हा कोसळणाऱ्या सरी, यामुळे लोकांचा प्रत्येक दिवस असह्य बनला आहे.‘रेड अलर्ट’, ‘येलो अलर्ट’ हे शब्द आता बागुलबुवा बनले आहेत. छत्री, बूट, रेनकोट ही माणसाची नवी ओळख झाली आहे.
पण या नैसर्गिक आपत्तीचं मूळ केवळ निसर्गात नाही, तर आपल्या कृतीत आहे.वाऱ्यांच्या दिशा, समुद्रातील उष्णता आणि तापमानातील अस्थिरता, ही सगळी मानवनिर्मित हवामान बदलाची लक्षणं आहेत.आपल्या विकासाच्या हव्यासाने आपण निसर्गाशीच वैर केलं.आता निसर्गाने फक्त एक चुणूक दाखवली आहे आणि आपणच पुरते असह्य होऊन कोलमडलो आहोत. कधी मध्ये कुठेतरी होणारी ढगफुटी आता सर्वत्र सर्व ठिकाणी नित्याचीच झाली आहे.
तेंव्हा आता कोणाला दोषी धरण्यापेक्षा प्रशासन आणि समाज दोघांनीही जागं व्हायला हवं.केवळ पंचनाम्यांवर थांबून चालणार नाही.जलनियोजन, माती संवर्धन, पाणलोट क्षेत्राचं पुनरुज्जीवन आणि हवामान-अनुकूल शेती या गोष्टी कृतीत आणण्याची वेळ आली आहे.कारण आता हा प्रश्न केवळ पावसाचा नाही, तर जगण्याचा आहे. आज “जा रे जा रे पावसा…” ही ओळ बालगीत नाही,
तर हतबल शेतकऱ्याची आर्त हाक बनली आहे.
चौकट
आभाळ फाटलं, कोपरगावात निसर्गाचा प्रकोप!अवकाळी वादळासह पावसाचा कहर; विजेचे खांब कोसळले, पत्रे उडाली, झाडे पडली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी!
Post Views:
121





